नागपूरमधील सदर पोलिस स्टेशनच्या आवारात बॉम्बस्फोट !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

  • परिसरात खळबळ : बॉम्बशोध
  • नक्षलविरोधी सेल आणि फॉरेन्सिकचे पथकाकडून तपासणी 

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्त शनिवारी शहरात देशभरातील "व्हीआयपी'दाखल होत असताना, शुक्रवारी नागपुरातील सदर पोलिस ठाण्याच्या परिसरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेचा तपास करण्यासाठी बॉम्बशोध नाशक पथक, नक्षलविरोधी सेलचे पथक आणि फॉरेन्सिक सेलचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासणी सुरू केली आहे. 

सदर पोलिस ठाण्यामध्ये इलेक्‍ट्रिक फिटिंगचे काम सुरू आहे. या कामाचे ज्या व्यक्तीला कंत्राट दिले आहे, त्याची माणसे काम आटोपून दूपारचा डबा खाण्यासाठी भिंतीलगत असलेल्या हिरवळीवर बसले. ते डबा उघडणार तोच कानठळ्या बसविणारा मोठा आवाज झाला. दरम्यान ठाण्यात बसलेल्या पोलिस आवाजाच्या दिशेने बाहेर धावून आले. तसेच जेवणास बसलेले मुकेश निंबर्ते, अविनाश चौधरी आणि प्रतीक भेदे पळू लागले. मात्र, झालेल्या स्फोटाची तीव्रता कमी असल्याने तिघेही थोडक्‍यात बचावले.

दरम्यान सुरक्षाभिंतीला मोठे भगदाड पडले. पोलिसांनी प्रकरणाची माहिती तत्काळ बॉम्बशोध व नाशक विभाग आणि फॉरेन्सिक विभागाला दिली. दोघांचेही पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी सुरुवात केली. दरम्यान एका काचेच्या बाटलीमध्ये स्फोटके भरुन हा स्फोट घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, उद्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्‌ कस्तूरचंद पार्क मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस ठाण्याच्या परिसरात झालेला स्फोटामुळे "व्हीआयपी' व्यक्तींच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा :

आणखी ताज्या बातम्या वाचा :

Web Title: nagpur news bomb blast sadar police station nitin gadkari function