पुस्तकांबाबत अनभिज्ञता भ्रष्टाचाराचीच पावती
नागपूर - महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी ग्रंथालय विभागाने लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली. परंतु पुस्तकांच्या हिशेबासंदर्भात अनभिज्ञता दर्शवून ग्रंथालय विभागाने भ्रष्टाचाराचीच पावती दिली. त्यामुळे पुस्तकांवरील खर्च अन् पुस्तकांची संख्या तपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून केली.
नागपूर - महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी ग्रंथालय विभागाने लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली. परंतु पुस्तकांच्या हिशेबासंदर्भात अनभिज्ञता दर्शवून ग्रंथालय विभागाने भ्रष्टाचाराचीच पावती दिली. त्यामुळे पुस्तकांवरील खर्च अन् पुस्तकांची संख्या तपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून केली.
माहिती अधिकाराअंतर्गत महापालिकेनेच उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून ‘सकाळ’ने आज ‘ग्रंथालय पुस्तक खरेदीत घोळ’ या मथळ्यांतर्गत ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. गेल्या चार वर्षांत ग्रंथालय विभागाने १९ लाखांची पुस्तके खरेदी केली. मात्र, या ग्रंथालयांतील पुस्तकांच्या एकूण संख्येची नोंदच नसल्याचे नमूद करीत स्वतःच्याच बेजबाबदारीचे प्रदर्शनाही या विभागाने मांडले. त्यामुळे पुस्तके खरेदी केली की नाहीत? असा प्रश्न उपस्थित करीत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले. सोशल मीडियावर या वृत्ताची सुज्ञ नागरिकांनी दखल घेत महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुस्तक खरेदीच्या नावावर वर्षानुवर्षे बोगस बिले दाखवून दिशाभूल करणारी मंडळी आहेत. सर्वत्र हाच प्रकार सुरू आहे, मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
- चांगदेश सोरते
एवढी पुस्तके खरेदी करूनही वाचनालयांवर अवकळा दिसून येत आहे. नागरिकांनी किती घोटाळे सहन करायचे? पुस्तके खरेदी झाली, परंतु ज्ञानगंगा पोहोचलीच नाही.
- संजय चामट
महापालिकेत पैसा नाही, तरीही घोटाळा का होतो? याबाबत प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार?
- अजीज भाई
ज्या उद्देशाने ग्रंथालये सुरू करण्यात आलीत, तो भ्रष्ट अधिकारी, राजकारण्यांमुळे सफल होताना दिसत नाही. विचारात परिवर्तन घडविणाऱ्या पुस्तकांबाबत दुर्लक्ष अक्षम्य आहे.
- दिलीप तडस
पुस्तक खरेदीच्या नावावर अधिकारी, नगरसेवकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असावे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करून जनतेच्या पैशाची वसुली करावी.
- शरद भांडारकर
इंटरनेटच्या काळात वाचनसंस्कृती तशीही नष्ट होत आहे. त्यात मनपातील अधिकाऱ्यांच्या खाऊ धोरणाने वाचन संस्कृती संपूर्ण नष्ट होईल.
- प्रा. दीपक कडू
आता या पुस्तक खरेदीतून मनपा अधिकारी ‘वाचण्याचा’ प्रयत्न करतील. ही मनपा आहे की ‘धन खा’ हेच कळत नाही.
- प्रा. राजेश क्षीरसागर
महापालिका शिक्षणाच्या प्रसाराबाबत किती जागरूक आहे, याचा हा नमुनाच आहे. या प्रकरणात निश्चितच चौकशी झाली पाहिजे.
- किशोर वरभे
या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. आयुक्तांनी कुणाचाही भ्रष्टाचार खपवून घेऊ नये.
-पूजा चौधरी
ग्रंथालयाच्या नावावर अनुदान लाटण्याचे काम बिनधास्तपणे सुरू आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुंभकर्णी झोपेतून जागे होण्याची गरज आहे.
- सपन नेहरोत्रा
वाचनसंस्कृती रुजविण्यात वाचनालयाचे महत्त्व आहे. वाचनालये चांगली ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु त्यातही अनियमितता होत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे.
-पुरुषोत्तम पंचभाई