बाता बुलेट ट्रेनच्या अन्‌ ‘हायस्पीड’ फाइलबंदच

योगेश बरवड
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नागपूर - देशात बुलेट ट्रेनचे वारे वेगात वाहत असताना प्रस्तावित हायस्पीड, सेमीहायस्पीड ट्रेन, मात्र खोळंबलेल्याच आहेत. रेल्वेगाड्या वेगवान होण्यासाठी रूळ सक्षमीकरणाची कामे संथगतीने सुरू असल्याने रेल्वे प्रवास वेगवान होणार तरी कधी?, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

नागपूर - देशात बुलेट ट्रेनचे वारे वेगात वाहत असताना प्रस्तावित हायस्पीड, सेमीहायस्पीड ट्रेन, मात्र खोळंबलेल्याच आहेत. रेल्वेगाड्या वेगवान होण्यासाठी रूळ सक्षमीकरणाची कामे संथगतीने सुरू असल्याने रेल्वे प्रवास वेगवान होणार तरी कधी?, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

स्वस्त आणि सुरक्षित माध्यम म्हणून रेल्वेचा पर्याय निवडला जातो. मात्र, अन्य प्रगत देशांच्या तुलनेत वेगाच्या बाबतीत भारतीय रेल्वे फारच माघारली आहे. ट्रेन वेगवान व्हाव्यात या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सादर केलेल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबाद, नागपूर-बिलासपूर यासह एकूण आठ सेमी हायस्पीड ट्रेनची घोषणा केली होती. गतवर्षीच्या अर्थसंकल्पातून नागपूर-सिकंदराबाददरम्यान हायस्पीड रेल्वे चालविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

रेल्वेचे जाळे देशभरात असले तरी अनेक वर्षे जुन्या रेल्वेरुळांमुळे हायस्पीड ट्रेन चालविण्यावर मर्यादा आहेत. हा अडसर दूर करण्यासाठी रेल्वे रुळांच्या सक्षमीकरणासह गरजेच्या ठिकाणी रेल्वेरुळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने  ही कामे सुरू आहेत. नागपूरला जोडल्या जाणाऱ्या मार्गांचा विचार केल्यास कळमना-दुर्ग आणि नागपूर-कळमना तिसरी लाइन, इटारसी-नागपूर आणि नागपूर-बल्लारशा तिसरा मार्ग, नागपूर-सेवाग्राम तिसरा व चौथी लाइन प्रस्तावित आहे. त्यातील दुर्ग-कळमना दरम्यानची कामे प्रगतिपथावर असली तरी उर्वरित मार्गांची कामे मात्र खोळंबलेल्या अवस्थतच आहेत. भौगोलिकदृष्ट्या नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रेल्वेस्थानक आहे. येथून दररोज सुमारे सव्वाशे प्रवाशी गाड्या धावतात. सुमारे ४० हजार प्रवाशांचा सतत राबता असतो. सद्यस्थितीतील रेल्वेगाड्यांची गती सरासरी ८० ते १०० किमी प्रतितास आहे. राजधानीसारख्या काही गाड्या ११० ते १२० किमी वेगाने धावतात. सेमी हायस्पीडचा वेग १५० ते २०० किमी आणि हायस्पीड २०० ते २५० किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. नव्या रेल्वे रूळ टाकण्यासह रुळांच्या सक्षमीकरणाची कामे पूर्ण होताच त्यांचा सर्वाधिक लाभ नागपूरला होणार आहे. नागपूरमार्गे हायस्पीड, सेमी हायस्पीड गाड्यांसोबतच अस्तित्वातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढविणे शक्‍य होणार आहे. 

हायस्‍पीड गाड्या लवकर सुरू व्‍हाव्‍यात
सध्या देशात बुलेट ट्रेनवर जोरात चर्चा सुरू आहे. मात्र, या गाडीचे तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात नसेल अशी प्रवाशांची धास्ती आहे. यामुळे बुलेट ट्रेनपेक्षा प्रस्तावित हायस्पीड गाड्या लवकरात लवकर सुरू करून प्रवास वेगवान केला जावा, अशी प्रवाशांची माफक अपेक्षा आहे.

Web Title: nagpur news Bullet train