सीसीटीव्ही यंत्रणेसाठी पूर्वतयारी प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर -  "सकाळ'ने केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. कॅमेऱ्यांची जागा यापूर्वीच निश्‍चित झाली आहे. कंट्रोल रूमसाठी उपनिरीक्षकांच्या अस्तित्वातील रूमचे रुंदीकरण करण्यात येत आहे. 

नागपूर -  "सकाळ'ने केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. कॅमेऱ्यांची जागा यापूर्वीच निश्‍चित झाली आहे. कंट्रोल रूमसाठी उपनिरीक्षकांच्या अस्तित्वातील रूमचे रुंदीकरण करण्यात येत आहे. 

"सकाळ'ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल अचानक सक्रिय झाले. सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. एक एक करीत बहुतेक इल्लीगल एन्ट्रीज बंद झाल्या. अनेक वर्षांपासून रखडलेल्या इंटिग्रेटेड सेक्‍युरीटी सिस्टिम कार्यान्वित करण्याला प्राधान्य देण्यात आले. सकाळच्या सततच्या पाठपुराव्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून नवी दिल्लीच्या कंपनीला सीसीटीव्ही यंत्रणेचे कंत्राट देण्यात आले. निविदेतील अटीनुसार अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या खरेदीसाठी वेळ लागत असला तरी ऑक्‍टोबरपर्यंत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याचा प्रयत्न आहे. 

सराईत गुन्हेगारांच्या छायाचित्रासह संपूर्ण माहिती, आरोपींची सवय आणि गुन्ह्याच्या पद्धतीसंदर्भात इत्थंभूत माहिती या यंत्रणेत पूर्वीच फीड केली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे गुन्हेगारांची मोठी यादीच आहे. त्यातील सराईत गुन्हेगार, टोळीने चोऱ्या करणाऱ्यांची माहिती प्राधान्य क्रमाने फिड राहील. शिवाय विविध सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनेही कुख्यात गुन्हेगारांची माहिती घेऊन ती यंत्रणेत समाविष्ट करण्यात येईल. या अत्याधुनिक यंत्रणेत पूर्वीच छायाचित्र असलेला गुन्हेगार कॅमेऱ्यांच्या टप्प्यात येताच सायरन वाजून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती मिळेल. यानंतर त्यांच्या हालचालींवर बारीक वॉच ठेवणे शक्‍य होईल. 

241 अत्याधुनिक कॅमेरे लागणार 
नागपूर स्थानकावर अत्याधुनिक पद्धतीचे 360 डीग्री फिरणारे 241 कॅमेरे लावण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा कॅमेऱ्याच्या टप्प्यात राहील, अशा पद्धतीने त्यांची रचना राहणार असून त्यासाठी जागेची निश्‍चितीही करण्यात आली आहे. सर्वच कॅमेरे हाय रिझॉलेशन आणि नाईट व्हिजन राहणार आहेत. कितीही झूम केले तरी चित्रात स्पष्टता राहणार आहे. यामुळे गुन्हेगारांसोबतच प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे शक्‍य आहे. 

नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी 
अप्रिय घटनांसह गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा, यादृष्टीने संपूर्ण यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात येणार आहे. पण, नवीन पदे मिळणार नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाने अस्तित्वातील काही कर्मचाऱ्यांची पदे निरस्त करून निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या नागपूर विभागात एकच निरीक्षक आहे. पण, प्रस्तावानुसार दोन अतिरिक्त निरीक्षक मिळणार आहेत. त्यातील एकाची नियुक्ती इंटिग्रेटेड सेक्‍युरीटी सिस्टिम हाताळण्यासाठी करण्यात येणार असून, नरखेड येथे नवीन ठाणे सुरू करून दुसऱ्या निरीक्षकाची नियुक्ती करण्याचा विचार आहे. 

Web Title: nagpur news cctv