नोटा बदलवणारे सीसीटीव्हीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागपूर - चलनातून बाद केलेल्या एक कोटीच्या नोटा बदलून देण्याचा व्यवहार करणारे आठ ते दहा आरोपी सदरमधील नामांकित हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यात सर्वांचे चेहरे समोर आले असून, नावे व पत्त्यांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. सर्वांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथके पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर - चलनातून बाद केलेल्या एक कोटीच्या नोटा बदलून देण्याचा व्यवहार करणारे आठ ते दहा आरोपी सदरमधील नामांकित हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यात सर्वांचे चेहरे समोर आले असून, नावे व पत्त्यांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. सर्वांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथके पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जुन्या नोटा बदलवून देणारा प्रमुख आरोपी प्रसन्न पारधी (रा. न्यू धरमपेठ) याने पोलिसांना देशभरातील ‘लिंक’ दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या माध्यमातून पोलिस भक्‍कम पुरावे तयार करीत आहेत. शनिवारी गुन्हे शाखेने पारधीला न्यायालयात उपस्थित केले असता गुरुवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली.

वॉक्‍स कुलर चौकातील राणा इमारतीत आरबीआयच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून चलनातून बाद झालेल्या अडीच कोटींच्या नोटा बदलून देण्याचा व्यवहार सुरू होता. येथे डीसीपी संभाजी कदम आणि एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी छापा मारून प्रसन्ना पारधीला अटक केली. साथीदार रिषी खोसला, कुमार छुगानी व वर्धा येथील डॉक्‍टर हे तिघे पळून गेले.

पोलिसांनी खाक्‍या दाखवून प्रसन्ना पारधीकडून मुख्य लिंक प्राप्त केली. त्याने ज्या हॉटेलमध्ये नागपूरसह दिल्ली आणि अन्य राज्यांतील काही अधिकारी आणि व्यावसायिक थांबले होते, त्या हॉटेलचे नाव सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी सदरमधील नामांकित हॉटेलमधील २५ जुलैपासूनची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. हॉटेल मॅनेजरचे बयाण घेतले. खोली कुणाच्या नावावर बुक होती, याचीही माहिती मिळाली.

‘सीबीआय-आयबी’चा समांतर तपास
नोटा बदलविण्याचे प्रकरण थेट देशाच्या सुरक्षा व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेशी जुळलेले असल्यामुळे सीबीआय आणि गुप्तचर संस्थेने समांतर तपास सुरू केला आहे. गुप्तचर संस्थेने शुक्रवारीच गुन्हे शाखेकडून एफआयआरची प्रत प्राप्त केली आणि तपास सुरू केला. तीन दिवसांपूर्वीच सीबीआयचे दोन अधिकारी गुन्हे शाखेत आले होते. त्यानंतर ते आरबीआयमध्येही गेले. सीबीआयनेही कसून तपास सुरू केला आहे.

वर्ध्याच्या डॉक्‍टरने दिला चकमा
आरबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करण्याचे काम वर्ध्याचा डॉक्‍टर आणि कुमार छुगानी करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने वर्ध्यात संबंधित डॉक्‍टरच्या घरावर छापा मारला. मात्र, छापा मारण्यापूर्वीच डॉक्‍टरने पोलिसांना चकमा देऊन राज्यातून बाहेर पळ काढल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur news cctv crime Old notes