चक्रधर राइस मिलला ठोकले सील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

नागपूर - सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तांदुळाचा काळाबाजार केल्याप्रकरणी नगरधन येथील सुनील अग्रवाल याच्या मालकीच्या चक्रधर राइस मिलला कळमना पोलिसांनी गुरुवारी टाळे ठोकले. राइस मिलमध्ये कोट्यवधींचे सरकारी धान्य साठविल्याची माहिती आहे. ही कारवाई कळमना पोलिसांनी केली.

नागपूर - सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तांदुळाचा काळाबाजार केल्याप्रकरणी नगरधन येथील सुनील अग्रवाल याच्या मालकीच्या चक्रधर राइस मिलला कळमना पोलिसांनी गुरुवारी टाळे ठोकले. राइस मिलमध्ये कोट्यवधींचे सरकारी धान्य साठविल्याची माहिती आहे. ही कारवाई कळमना पोलिसांनी केली.

सरकारी स्वस्त धान्य दुकानासाठी येणारे तांदूळ, गहू, साखर, डाळ आदींची काळाबाजारी  करून ती खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकण्यात येते. याची गुप्त माहिती उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. माहितीच्या आधारावर १६ मार्चला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उपायुक्त बावचे पथकासह भंडारा मार्गावरील कापसी उड्डाणपुलावर सापळा रचून होते. पोलिसांनी गोंदियाकडे जाणारा ट्रक (एचएम-३५/के-३६५९) पोलिसांनी पकडला होता. ट्रकची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात तांदूळ निघाला. चौकशी केली असता तो तांदूळ सरकारी असून, खुल्या बाजारात विक्रीसाठी जात होता.

ट्रकमधील तांदूळ सुनील अग्रवाल (रा. कामठी) यांच्या मालकीचा असून, त्याचे रामटेक तालुक्‍यातील नगरधन येथे मोठे राइस मिल असल्याची माहिती समोर आली. गुरुवारी उपायुक्तांच्या निर्देशानुसार कळमनाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे, हवालदार छगन राऊत, प्रफुल्ल भगत, राजू नाईक, प्रवीण लांडे आणि राजेश तिवारी यांनी राइस मिलमध्ये तपास मोहीम राबवली. त्यावेळी मिलमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी पोत्यांमध्ये धान्य सापडले. पोलिसांनी राइस मिल व गोदामाला टाळे ठोकले.

सरकारी धान्याच्या काळाबाजार करण्याच्या प्रकरणात इतक्‍या मोठ्या प्रमाणात धान्य जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुनील अग्रवाल हा शिवकुमार शर्मा याच्या नावाने हा गोरखधंदा चालवायचा. मात्र, पोलिसांनी खोलवर तपास करून शर्माच्या पाठीमागे असलेल्या अग्रवाललाही आरोपी केले.

Web Title: nagpur news Chakradhar Rice Millla Seal