महाऊर्जाचे कार्य देशहिताचे - ऊर्जामंत्री बावनकुळे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नागपूर - सौरऊर्जा आता काळाची गरज झाली आहे. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा स्वस्त उपलब्ध होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाऊर्जा ही जनतेला सौरऊर्जा वापरण्यास उद्युक्त करण्याचे देशहिताचे कार्य करीत असून यामुळे जनतेत सौरऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोराडी येथे केले. 

नागपूर - सौरऊर्जा आता काळाची गरज झाली आहे. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा स्वस्त उपलब्ध होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाऊर्जा ही जनतेला सौरऊर्जा वापरण्यास उद्युक्त करण्याचे देशहिताचे कार्य करीत असून यामुळे जनतेत सौरऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोराडी येथे केले. 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (महाऊर्जा) सौरऊर्जेबाबतच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आज कोराडी मंदिर परिसरात झाले. याप्रसंगी महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, महाव्यवस्थापक पुरुषोत्तम जाधव, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, महावितरणचे मुख्य अभियंता शेख, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक मानवसंसाधन विनोद बोंदरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. बावनकुळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. 

याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरऊर्जेला प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त नागरिकांनी सोलरचा वापर करावा, असे निर्देश राज्यांना दिले आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम महाऊर्जाच्या या कार्यातून होत आहे. परंपरागत वीजनिर्मिती कमी करून नैसर्गिक स्रोतांपासून जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचे पंतप्रधानांचे धोरण आहे. घराच्या छतावर, शेतात सौर वीजनिर्मिती करून त्या विजेचा वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे, असे सांगून अपारंपरिक ऊर्जा धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून 40 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेशी जोडण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतल्याचे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले, 500-700 शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्याच शेतात वीजनिर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे सुमारे अडीच हजार मेगावॉट पारंपरिक विजेची बचत होईल. कोळशावर आधारित वीजनिर्मिती कमी होणार आहे. सोलर ऊर्जेबाबत जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने महाऊर्जाचे आता राज्यात 10 कार्यालये सुरू झाली आहेत. या सर्व कार्यालयांच्या मार्फत सौरऊर्जेच्या क्षेत्रात मोठे काम उभे राहणार आहे. एलईडी लाइटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत शक्‍य झाली आहे. सौरऊर्जानिर्मितीचे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेले लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाऊर्जाचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले. 

अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून महाऊर्जाचा सौरऊर्जेचा वापर आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचेही माने म्हणाले. 

या प्रदर्शनामध्ये 40 विविध कंपन्यांचे स्टॉल्स असून या स्टॉल्सवर सौरऊर्जेची उपकरणे तसेच ऊर्जासंवर्धनाचे उपकरणे उपलब्ध आहेत. आयोजनासाठी महाव्यवस्थापक सारंग महाजन यांच्या नेतृत्वात संपूर्ण चमू झटत आहे. 

Web Title: nagpur news Chandrashekhar Bawankule