शहर काँग्रेसमधील वाद राहुल गांधींकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नागपूर - शहर काँग्रेसमधील वाद आता थेट राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पोहोचला. शहर काँग्रेसने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिशीने संतापलेल्या चतुर्वेदी समर्थकांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून वाद मिटविण्याठी केंद्रीय पातळीवरूनच पर्यवेक्षक पाठवावा, अशी विनंती केली. त्यामुळे आता राहुल गांधी काय भूमिका घेतात, याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे. 

मागील वर्षी फेब्रुवारीत मनपा निवडणुकीत काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली होती. मनपा निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अनेक बंडखोर उभे करण्यात आले. या उमेदवारांना माजी मंत्री चतुर्वेदी यांनी रसद पुरविल्याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केल्या होत्या. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला पुढील कारवाईच्या सूचना केल्या. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने २५ जानेवारीला माजी मंत्री चतुर्वेदी यांना नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर सादर करण्याची सूचना केली. यामुळे असंतुष्टांमध्ये खळबळ उडाली असून, त्यांनी थेट अध्यक्ष राहुल गांधी यांनाच पत्र पाठविले. शहर काँग्रेसमधील वाद मिटविण्याठी केंद्रीय पातळीवरूनच पर्यवेक्षक पाठवावा, अशी विनंती करण्यात आली. यामुळे शहर काँग्रेसमधील वाद आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. नागपूर शहर काँग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार विरुद्ध नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी असा वाद आहे. मुत्तेमवार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गोटातील मानले जातात. राऊत आणि चतुर्वेदी व त्यांच्या समर्थकांनी मुत्तेमवार व चव्हाण यांच्याविरोधात आघाडी उघडली. दरम्यान, विकास ठाकरे यांनी नोटीस पाठविली असल्याचा दावा केला असला तरी सतीश चतुर्वेदी यांनी मात्र आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.

Web Title: nagpur news city congress dispute to rahul gandhi