समृद्धी महामार्गासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना स्वीकारणार - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - समृद्धी महामार्ग व कॉरिडॉरच्या सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना स्वीकारल्या जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बांधकामाच्या निर्मितीत आकर्षकता असेल, तर ती राज्याची ओळख ठरते. पूर्वी गेट वे ऑफ इंडिया ही मुंबई व राज्याची ओळख होती. आता वरळी-वांद्रे सी लिंक राज्य व मुंबईची ओळख झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, 'समृद्धी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईत केवळ आठ ते दहा तासांत पोचणे शक्‍य होणार आहे. हा प्रकल्प कृषी, उद्योग व विकासासाठी समृद्धी कॉरिडॉर म्हणून विकसित केला जात आहे.

राज्यातील 24 जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग कृषी समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. गॅस, पेट्रोल, पेट्रोकेमिकल आदी पाइपलाइन या मार्गावर राहणार आहे. तसेच विमान उतरण्याचीसुद्धा सुविधा असणाऱ्या या राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे डिझाइन हे जागतिक स्तराचे असावे, यासाठी सर्व अभियांत्रिकी वास्तुविशारदांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वरळी वांद्रे सी लिंकसोबत वांद्रे ते वर्सोवा नवीन सी लिंक तयार करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट ते वरळी समुद्री मार्ग, ट्रान्स हार्बर सी लिंकचे बांधकाम करताना सुरक्षा, सुंदरता व टिकाऊपणा याला प्राधान्य आहे. देशातील रस्ते विकासासोबत पूल व बोगद्यांच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: nagpur news The concept of innovation will be adopted for the prosperity of the highway