शहर काँग्रेसमधील आक्रोश चंद्रपुरात व्यक्त होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर - शहरातील नेत्यांमधील मतभेद विकोपाला गेल्याने विभागाचे मुख्यालय नागपूरला टाळून काँग्रेसने चंद्रपूरला विभागीय जनाक्रोश मेळावा आयोजित केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि नागपूरमधील असंतुष्टांनी विभागीय मेळाव्याच्या दिवशी तेही अगदी समोरच जिल्हा मेळावा आयोजित करून थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिले आहे. या जिल्हा मेळाव्याला नागपूरमधूनही मोठी रसद पुरविल्या जात आहे. 

नागपूर - शहरातील नेत्यांमधील मतभेद विकोपाला गेल्याने विभागाचे मुख्यालय नागपूरला टाळून काँग्रेसने चंद्रपूरला विभागीय जनाक्रोश मेळावा आयोजित केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि नागपूरमधील असंतुष्टांनी विभागीय मेळाव्याच्या दिवशी तेही अगदी समोरच जिल्हा मेळावा आयोजित करून थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिले आहे. या जिल्हा मेळाव्याला नागपूरमधूनही मोठी रसद पुरविल्या जात आहे. 

राज्यात भाजप-सेना युतीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात महागाई, नोटाबंदी, जीएसटीने त्रस्त झालेले नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने आठवडाभर आठ नोव्हेंबरपर्यंत जनआक्रोश सप्ताह आयोजित केला आहे. प्रत्येक विभागातील महसुलाच्या मुख्यालयी विभागीय मेळावा आयोजित केला आहे. मात्र, नागपूरचा विभागीय मेळावा चंद्रपूरला सहा नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराम मोघे यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, नागपूरऐवजी चंद्रपूरला मेळाव्या आयोजित करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही.

नागपूरमध्ये मुत्तेमवार आणि चतुर्वेदी-राऊत गटात अनेक दिवसांपासून टशन सुरू आहे. एवढेच नव्हे, तर मुत्तेमवार गटाच्या असलेल्या महापालिकेतील गटनेत्यालाही बदलवण्यात आले. न्यायालयात याचिकाही दाखल केली. न्यायालयाने याचिका खारीज केल्यानंतर काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. अशा परिस्थितीत नागपूरला विभागीय मेळावा घेणे काँग्रेसला धोक्‍याचे वाटले. तो चंद्रपूरला हलवण्यात आला. मात्र, नागपूरसारखीच परिस्थिती चंद्रपूरची आहे. येथे वडेट्टीवार आणि नरेश पुगलिया  यांच्यामधून विस्तवही जात नाही. येथील काँग्रेस कमिटीच्या निवडणुकीदरम्यान हाणामारीसुद्धा झाली होती. चंद्रपूरला मेळावा जाहीर होताच पुगलिया गटाने जिल्हा मेळाव्याची तयारी सुरू केली. मंगळवारी चतुर्वेदी-राऊत गटाच्या इंदिरा गांधी पुण्यतिथीच्या कार्यक्रमात नरेश पुगलिया यांच्या मेळाव्याला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद आदींनी केले. येथून तीन हजार कार्यकर्त्यांना मेळाव्यास पाठवून आपली ताकद दाखवण्याची धडपड सुरू आहे. मुत्तेमवार गटाने मात्र मेळाव्याविषयी मौन पाळले आहे.

Web Title: nagpur news congress chadrapur