वाद-विवाद, हेवेदावे विसरून काँग्रेस नेते एकत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर

नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर फोडण्यापासून तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेक गटांत विखुरलेली काँग्रेस आज एकत्र दिसून आली. गटातटात विभागलेल्या काँग्रेस नेत्यांनी आज देवडीया काँग्रेस भवनात साथ-साथ वेळ घालविला. काही वेळासाठी एकत्र आलेल्या या काँग्रेस नेत्यांमुळे कार्यकर्त्यांतही क्षणभर उत्साह दिसून आला. 

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोप सुरू केले. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसची अनेक शकले झाल्याचे शहरात चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत निरुत्साह असून पक्षाची नेत्यांना काळजीच नसल्याच्या भावनाही अनेकदा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. आज मात्र निरुत्साह कार्यकर्त्यांनी उत्साहाचा क्षण अनुभवला. निमित्त होते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंतीचे. देवडीया काँग्रेस भवनात एकमेकांकडे पाठ फिरविणारे शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व त्यांना पदावरून खाली खेचणारे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह अतुल लोंढे, यशवंत कुंभलकर, कृष्णकुमार पांडे, एस. क्‍यू. जमा, रामगोविंद खोब्रागडे, नितीन कुंभलकर, डॉ. ऋचा जैन, परमेश्‍वर राऊत, बाबा शेळके, नियामत ताजी, चंदू वाकोडीकर आदी उपस्थित होते. सध्या महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून विकास ठाकरे यांच्याविरोधात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यांनी मोर्चा उघडला आहे. प्रकरण न्यायालयापर्यंत गेले असून न्यायप्रविष्ट आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असते. मात्र, हे सारे वाद विसरून आज स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादनासाठी काँग्रेस नेते एकत्र आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आलेले झारखंड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार चौबेही यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांतील ही एकता पुढेही कायम राहावी, अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: nagpur news congress leader together