सत्ताधाऱ्यांचा कॉंग्रेसवर हल्ला, विरोधकही आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

नागपूर - स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी सादर केलेल्या 2271 कोटींच्या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष म्हणजे, सर्वच नगरसेवकांनी केलेल्या वॉर्ड निधी वाढविण्याच्या सूचनेसह अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या प्रारंभीच सत्ताधाऱ्यांनी कॉंग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यामुळे संधी मिळताच कॉंग्रेस सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेत उट्टे काढण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात कलगीतुरा रंगला. बसप सदस्यांनी भाजप व कॉंग्रेस दोघांवरही टीका करीत वेगळेपण जपले. 

स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी शनिवारी सभागृहात मांडलेल्या 2271 कोटींच्या अर्थसंकल्पावर महाल येथील नगरभवनात चर्चा झाली. संख्याबळाच्या आधारे पक्षांना चर्चेसाठी वेळ दिला होता. सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी चर्चेला सुरुवात करतानाच 50 वर्षांतील कामांबाबत कॉंग्रेसवर हल्ला केला. खेड्यासारखे शहर अशी नागपूरची ख्याती होती. मात्र, भाजपच्या 16 वर्षांच्या काळात शहराने सर्वच आघाड्यांवर विकास केल्याचा दावा करीत अंदाजपत्रकाचे स्वागत केले. संजय बंगाले यांनी जकात रद्द करून एलबीटी आणल्याने शहराच्या विकासाला खीळ बसल्याचे नमूद करीत सभागृहात कॉंग्रेस सदस्यांची कोंडी केली. संधी मिळताच कॉंग्रेस सदस्यांनीही आक्रमण केले. अर्थसंकल्पाचे पुस्तक पंचांगाप्रमाणे असल्याने त्यात विकासाचा मुहूर्त असल्याचे वाटले. परंतु, ते पोथीच निघाल्याची टीका प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केली. गेल्या दहा वर्षांत सादर केलेल्या अर्थसंकल्पाची एकूण रक्कम 20 हजार कोटींच्या घरात जात असून, तेवढी कामे शहरात झाली काय? असा सवाल विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. संदीप सहारे यांनी सत्ताधाऱ्यांनी शहराची दुर्दशा केल्यामुळेच पहिल्या दहातील शहर आता 137 व्या क्रमांकावर फेकल्या गेल्याचे नमूद केले. गरिबांसाठी या अर्थसंकल्पात कुठलीही योजना नाही, असेही ते म्हणाले. बसपचे जितेंद्र घोडेस्वार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाच्या विलंबासाठी कॉंग्रेस व भाजपला दूषणे दिली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी संदीप जाधव यांनी जुन्याच योजनांची अंमलबजावणी करण्याचे धाडस दाखविल्याचे सांगितले. माजी महापौर प्रवीण दटके यांनी अर्थसंकल्पात अनेक चांगल्या योजना असून, त्या गरिबांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगितले. 

Web Title: nagpur news congress municipal corporation budget