नगरसेवक चुटेले यांनीच केली पैशाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नागपूर - प्रभागातील तीन जनसंपर्क कार्यालयाचा खर्च भागविण्यासाठी भाजप नगरसेवक विजय चुटेले यांनीच दरमहा १५ हजारांची मागणी केल्याचा गंभीर आरोप महापालिका आरोग्य विभागातील जमादार संजय लुडेरकर यांनी केला. त्यांची मागणी पूर्ण न केल्याने खोटी तक्रार दाखल करून कटकारस्थान केल्याची पुस्तीही लुडेरकर यांनी जोडल्याने खळबळ माजली आहे.

धंतोली झोनचे सहायक अभियंता श्‍याम धरममाळी व सफाई कर्मचारी संजय लुडेरकर यांनी कार शोरूमच्या संचालकाकडे माझ्या नावे दोन लाखांची मागणी केली, अशी तक्रार नगरसेवक विजय चुटेले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत प्रशासनाने श्‍याम धरममाळी यांची आसीनगर झोनमध्ये, तर लुडेरकर यांची शुक्रवारी सतरंजीपुरा झोनमध्ये बदली केली होती. परंतु, आता लुडेरकर यांनी चुटेले यांच्यावरच पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप करीत खळबळ माजविली.

प्रभागात चुटेले यांची तीन जनसंपर्क कार्यालये आहेत. कार्यालयाचा खर्च म्हणून महिन्याला १५ हजारांची मागणी चुटेले यांनी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने चुकीचे आरोप करून माझ्या विरोधात महापालिका प्रशासनाकडे खोटी तक्रार केली. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी लुडेरकर यांनी केली आहे. महापौर, सत्तापक्षनेते व आयुक्तांना त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहेत. नगरसेवक विजय चुटेले यांच्याशी याप्रकरणी मोबाईलवर संपर्क साधला. परंतु, त्यांनी उचलला नाही. त्यामुळे संपर्क झाला नाही.

भाजपच्या प्रतिमेला तडे
भाजपच्या प्रभाग तीनमधील नगरसेविका नसीम बानो यांचे पती इब्राहिम खान हे त्रास देत असल्याचा आरोप करीत सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात महापालिकेत तक्रार केली. एवढेच नव्हे इब्राहिम खान यांच्याविरोधात सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला. त्यामुळे भाजपच्या प्रतिमेला चांगलाच धक्का बसला.  आता चुटेले यांच्याविरोधातही जमादाराने संताप व्यक्त केला.

Web Title: nagpur news corporator Vijay Chutele nagpur municipal