निराधार आरोपांवरून घटस्फोट नाही - कोर्ट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर - कुठल्याही पुराव्यांशिवाय निराधार आरोप करणाऱ्या पतीला दणका देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोट मिळण्यासाठी केलेले अपील फेटाळून लावले. या प्रकरणी दिलेल्या निर्णयात बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी विशिष्ट घटनांसह पतीने बाजू मांडणे गरजेचे असल्याचे न्यायालय म्हणाले. 

या प्रकरणातील दाम्पत्याचे लग्न २००६ मध्ये झाले. पत्नी स्वयंपाक करत नसल्यामुळे हॉटेलमधून भोजन मागवावे लागते. पत्नी सासरच्या कुटुंबीयांना टाळते. ती वारंवार माहेरी आणि मित्रांच्या घरी जाते. विविध प्रकारच्या धमक्‍या देते, असे आरोप पतीने लावले होते. या आरोपांच्या आधारावरच त्याने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाने याचिका खारीज केल्यामुळे पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या प्रकरणी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पतीच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. केवळ आरोप लावल्यामुळे पत्नीची क्रूरता सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्‍यक ते पुरावे आणि घटनांचे संदर्भ द्यायला हवेत. त्याशिवाय घटस्फोट देता येणार नाही, असेदेखील न्यायालय आपल्या निर्णयात म्हणाले आहे.

पत्नी कोणत्या प्रकारे क्रूरतेने वागते. ती कोणत्या प्रकारची धमकी देते हे स्पष्ट झाले पाहिजे, असे न्यायालयाने  निर्णयात म्हटले आहे. पतीने लावलेले आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत न्यायालयाने पतीचे अपील फेटाळून लावले आणि कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Web Title: nagpur news court Divorce