गोदाई शिक्षण संस्थेची जागा ताब्यात घ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - सरकारी जमिनीचा भाडेपट्टा करून त्यात फेरफार करणाऱ्या गोदाई शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या बी. एड. महाविद्यालयाची जागा परत घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

नागपूर - सरकारी जमिनीचा भाडेपट्टा करून त्यात फेरफार करणाऱ्या गोदाई शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या बी. एड. महाविद्यालयाची जागा परत घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

शेगाव येथील गोदाई शिक्षण प्रसारक मंडळाने मूळ नोंदणीकृत भाडेपट्टयात फेरफार करून जमिनीचे क्षेत्रफळ वाढविले. यानंतर बनावट कागदपत्रे सादर करून बी. एड. महाविद्यालयाला विद्यापीठाकडून संलग्नता आणि एनसीटीई भोपाळकडून मान्यता मिळविण्यात आली. या गैरप्रकाराविरुद्ध शेगाव येथील पत्रकार प्रकाश ऊर्फ मंगेश ढोले यांनी जनहित याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार, २००८ मध्ये संस्थेला भाडेपट्टा करून देताना मूळ १२ पानांचा दस्तऐवज शेगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयाने १६८१/०८ या क्रमांकावर नोंदविला. परंतु, शिक्षण संस्थेने मूळ १२ पानांच्या भाडेपट्टयात फेरफार करून संस्थेकडे जमिनीचे क्षेत्रफळ वाढवून दाखविले. याशिवाय बनावट शिक्‍के तयार करून दुय्यम निबंधकांच्या नावाचा वापर करून स्व. उत्तमराव देशमुख बी. एड. कॉलेजला मान्यता मिळविली आणि त्याच आधारावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची संलग्नता मिळविली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षण संस्थेकडे असलेल्या जागेचा भाडेपट्टा संपलेला आहे आणि संस्थाचालकांनी मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविले. तसेच जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. 

याचिकाकर्त्याचे पैसे परत
महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याच्या अमरावती विद्यापीठाच्या आदेशाविरुद्ध संस्थेने स्वतंत्र याचिका दाखल केली. यामुळे संलग्नेताचा मुद्दा निकाली लागण्यानंतरच जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात यावी, असे न्यायालय म्हणाले. याशिवाय याचिकाकर्त्याच्या तक्रारीतील आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने जमा करून घेतलेले ५० हजार रुपये सव्याज परत करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.

Web Title: nagpur news court Godari Education Society