व्हीसीए जिल्हा प्रशासनात पुन्हा सामना रंगणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नागपूर - भारत व ऑस्ट्रेलियात जामठा मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यामुळे पुन्हा एकदा व्हीसीए आणि जिल्हा प्रशासनात सामना होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सामन्यासाठी अद्याप जिल्हा परिषद व पोलिस विभागाने मंजुरी दिलेली नाही. तत्पूर्वीच व्हीसीएच्या वतीने तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

नागपूर - भारत व ऑस्ट्रेलियात जामठा मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यामुळे पुन्हा एकदा व्हीसीए आणि जिल्हा प्रशासनात सामना होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सामन्यासाठी अद्याप जिल्हा परिषद व पोलिस विभागाने मंजुरी दिलेली नाही. तत्पूर्वीच व्हीसीएच्या वतीने तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

भारत आणि इंग्लंडच्या टी-२० सामन्याच्यावेळी व्हीसीए व पोलिस विभागात वाद निर्माण झाला होता. आयपीएल सामन्यांच्या वेळी दिलेल्या सुरक्षेची थकबाकी आधी द्यावी नंतरच सुरक्षा  पुरविली जाईल अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर सामना व्हीसीएने जिंकला होता. आता एक ऑक्‍टोबरला जामठा स्टेडियमवर भारत व ऑस्ट्रेलियात पाचवा एकदिवसीय सामना होणार आहे. क्रिकेट सामन्यासाठी मनोरंजर कर  विभागाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी पूर्वी यासाठी परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिल्या जात होती. जीएसटी कायद्याअंतर्गत हा अधिकार संबंधित प्राधिकरणाला दिला आहे.

जामठा व्हीसीए मैदान जिल्हा परिषदेअंतर्गत येते. त्यामुळे मनोरंजन कराच्या परवानगीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला. जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून हा प्रस्ताव वित्त व लेखा विभागाकडे पाठविला. वित्त विभागाकडून याबाबत जीएसटी विभागाकडून मत मागविले. जीएसटी विभागाचे मत सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतच याबाबत संभ्रमात असल्याने अद्याप कोणत्याही प्रकारची परवानगी व्हीसीएला दिली नाही. जिल्हा परिषदेच्या मंजुरीशिवाय  तिकीट विक्री सुरू केल्याने सामना अडचणीत येणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत माथापच्ची
जीएसटी कायद्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनातच संभ्रम आहे. प्रशासनाने जीएसटी विभागाकडून मत मागविले. मात्र, त्यात तिकिटांवर आकारायच्या कराबाबतच माहिती आहे. मनोरंजनाबाबत परवानगीबाबत स्पष्टता नाही. जिल्हा परिषदेत रात्री उशिरापर्यंत यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती.

व्हीसीएचा अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप कुठलाच निर्णय घेतला नाही. तसेच सामन्यासाठी परवानगीसुद्धा दिली नाही.
- अनिल आकुलवार, सहायक गटविकास, पंचायत विभाग, जिल्हा परिषद.

व्हीसीएची फाइल आली आहे. सुटीवर असल्याने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
- के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, नागपूर.

Web Title: nagpur news cricket sports