विनयभंगप्रकरणीतीन वर्षे कारावास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नागपूर - एका पंधरा वर्षीय मुलीवर विनयभंग करणाऱ्या छायाचित्रकाराला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. इंगळे यांनी बुधवारी (ता. पाच) तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव अमर रामटेके (वय ३२, रा. नारा कॉलनी) असे आहे.

नागपूर - एका पंधरा वर्षीय मुलीवर विनयभंग करणाऱ्या छायाचित्रकाराला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. इंगळे यांनी बुधवारी (ता. पाच) तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव अमर रामटेके (वय ३२, रा. नारा कॉलनी) असे आहे.

पीडित मुलगी गांधी पुतळा चौकातील गीतांजली फोटो स्टुडिओमध्ये पासपोर्ट आकाराचे छायाचित्र काढण्यासाठी गेली होती. आरोपी हा स्टुडिओमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करतो. मुलीने त्याच्याकडे छायाचित्र काढून देण्यासंदर्भात विचारणा केली. त्यावर त्याने पहिल्या माळ्यावर असलेल्या स्टुडिओमध्ये जाण्यास सांगितले. सुरुवातीला आरोपीने मुलीचे दोन-तीन फोटो काढले. त्यानंतर त्याने छायाचित्र काढण्याच्या निमित्ताने सलगी साधत मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्‍लील कृत्य केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळलेली मुलगी स्टुडिओतील रिसेप्शनिस्टकडे आली. तिथे त्याने छायाचित्रकाराचे नाव विचारले आणि संपूर्ण हकीगत तिच्या कुटुंबीयांना सांगितली. 

पीडित मुलीच्या आईने तहसील पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. यानुसार, पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सरकारी पक्षाने पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तिची आई आणि बहीण यांचीदेखील साक्ष नोंदविण्यात आली. प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील अभय जिकार यांनी बाजू मांडली.  

Web Title: nagpur news crime