चिमुकलीच्या मृत्यूमुळे तणाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नागपूर  -धंतोली परिसरातील खासगी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयासमोर गर्दी केली. यामुळे या परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. रविवारी(ता. 23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

नागपूर  -धंतोली परिसरातील खासगी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयासमोर गर्दी केली. यामुळे या परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. रविवारी(ता. 23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

त्रिमूर्तीनगर येथील दीड वर्षाच्या मुलीच्या अंगावर गरम पाणी पडले. यामुळे ती भाजली. या स्थितीत उपचारासाठी येथील हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. केवळ पंधरा ते सतरा टक्केच भाजली असल्याचे सुरुवातीला डॉक्‍टरांनी सांगितले. कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्‍वास डॉक्‍टरांनी नातेवाइकांना दिला. चिमुकलीला त्रास होऊ नये यासाठी पहिल्या दिवशी बधिर करण्याची लस देण्यात आली. सुमारे दोन तासांनी बाळ शुद्धीवर आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाला पुन्हा तेच इंजेक्‍शन दिले. 24 तासांनंतर चिमुकली शुद्धीवर आल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दर दोन दिवसांनी भुलीचे इंजेक्‍शन दिले जात असल्याचे नातेवाईक सांगत होते. यामुळेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालतील या भीतीने डॉक्‍टरांनी पोलिसांना पाचारण केले. चिमुकलीला दर दोन दिवसांनी बधिर करण्याची लस देण्यात येत होती. दर दोन दिवसांनी ही लस का दिली जात होती, असा सवाल नातेवाइकांनी डॉक्‍टरांना केला. तक्रारीतही हेच बयाण नोंदविण्यात आले. वारंवार बधिर करण्याची लस दिल्याने मृत्यू झाला असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. 

शवविच्छेदनास नातेवाइकांचा विरोध 
नातेवाइकांनी शवविच्छेदनाला विरोध करीत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनाशिवाय देण्यात यावा अशी विनवणी केली. मात्र, डॉक्‍टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला नेला. मृत्यूचे प्रमाणपत्र देऊन मुलीचा मृतदेह द्यावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. मात्र, डॉक्‍टरांनी मृत्यूचे प्रमाणपत्र दिले नाही. यासंदर्भात डॉक्‍टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. तर रुग्णालय प्रशासनाने बोलण्यास टाळाटाळ केली. 

Web Title: nagpur news crime