बीट कॉइनने घातला  हजारो कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नागपूर - मलेशियाच्या दोघांनी भारतात येऊन बीट कॉईनच्या नावाने हजारो कोटींने गंडा घातला. एकट्या महाराष्ट्र राज्यात तब्बल ४०५ कोटींची फसवणूक या दोघांनी केली. त्यांच्यावर नागपूर आणि नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूरमधून १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची चार ते पाच कोटींनी फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

नागपूर - मलेशियाच्या दोघांनी भारतात येऊन बीट कॉईनच्या नावाने हजारो कोटींने गंडा घातला. एकट्या महाराष्ट्र राज्यात तब्बल ४०५ कोटींची फसवणूक या दोघांनी केली. त्यांच्यावर नागपूर आणि नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूरमधून १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची चार ते पाच कोटींनी फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मलेशियात राहणारे माईक लुसी ऊर्फ बहारुद्‌दीन युनूस सिद्दिकी आणि रोमजी बीन अहमद यांनी मलेशियातून इंटरनेटद्वारे ऑनलाईन फ्युचर बीट कंपनी उघडली. या कंपनीच्या माध्यातून ‘आभासी किंवा काल्पनिक सिक्‍के’ तयार केले. या कंपनीने ५ मार्च २०१७ मध्ये नागपुरातील वर्धा रोडवरील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सेमीनार घेतला. 

यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी,  गोंदिया, अमरावतीसह संपूर्ण राज्यातून जवळपास ७० ते ८० गुंतवणूकदार उपस्थित होते. या सेमीनारमध्ये बीट कॉइनची किंमत आणि ते कसे वापरावे याबाबत समजावून सांगण्यात आले. भारतात केवळ गुजरातमधील अमदाबाद येथे ‘झेबपे प्रा. लि. कंपनी’ ही बीट कॉइन खरेदी-विक्री करणारी एकमेव शासकीय मान्यता असलेली कंपनी आहे. बीट कॉइन क्रिप्टो करंसी असून, तिचा भाव दिवसेंदिवस लाखोंमध्ये वाढत आहे. ज्यांना बीट कॉइन खरेदी करायचे आहे. ते पाव, अर्धा पाव, अर्धा आणि एक अशा स्वरूपात खरेदी करू शकतात, अशी बतावणी लुसी आणि रोमजी यांनी केली. त्यांच्या भूलथापांना कार्यशाळेला उपस्थित सर्वच जण बळी पडले. 

नागपुरात गुन्हा दाखल
नागपुरातील मयूरेश किशोर गणोरकर हे मुंबईतील एका कंपनीत इंजिनिअर होते. सध्या ते प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यांनी मलेशियातून आलेल्या दोन्ही आरोपींच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमधील कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनी २६ लाख रुपयांचे २५ बीट कॉइन विकत घेतले. त्या बीट कॉइनची किंमत सध्या ७८ लाख रुपये आहे. आभासी चलन असल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वेबसाइटवर दिसत असलेल्या खात्यात ते पैसे जमा असल्याचे दिसत होते. मे २०१७ मध्ये अचानक ही बेवसाइट बंद पडली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी आर्थिक शाखेचे गणेश ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला. 

महिन्यात दीड टक्‍के लाभ
एका बीट कॉइनची किंमत जानेवारी २०१७ मध्ये एक लाख रुपये होती. कॉइनची किंमत हजारोंच्या घरात दरदिवशी झपाट्याने वाढते. गुंतवलेल्या कॉइनच्या किमतीवर दर महिन्याला दीड टक्‍के लाभ फ्युचर बीट कॉइन कंपनीच्या वतीने दिला जातो. ती रक्‍कम आभासी चलनाच्या रूपात वेबसाइट पोर्टलवर असलेल्या अकाउंटमध्ये दिसून येते. त्यामुळे अकाउंटमध्ये दररोज हजारो रुपये वाढत असल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात तो पैसा मिळत नाही.

विक्रीसाठी एजंट
दोन्ही आरोपी मलेशियातून बीट कॉइनचा व्यवसाय करीत होते. त्यांनी भारतातील जवळपास सर्वच राज्यांत फेसबुकवरून एजंट नेमले. त्यांना गुंतवणूकदारांना कसे आणायचे, किती कमिशन मिळेल, पैसे कसे उकळायचे, याचे प्रशिक्षण दिले. भारतातील एजंटने लुईस आणि रोमजी यांना घरबसल्या हजारो कोटी भारतातील उच्चशिक्षितांच्या खिशावर डल्ला मारून कमवून दिले. झटपट कमाईच्या आमिषाला बळी पडून उच्चशिक्षितांनी लाखो रुपये गमावल्याचे उघडकीस आले. 

असा झाला भंडाफोड
लुईस आणि रोमजी यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांची निवड कार्यशाळा घेण्यासाठी केली. नाशिकमध्ये कार्यशाळा घेत असताना रोमजीवर एका डॉक्‍टरला संशय आला. त्यांनी कसून चौकशी करीत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकशी केली असता रोमजी हा फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. तपासात दोघांनी मिळून महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना फसविल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा आकडा हा ५०४ कोटींपर्यंत पोहोचला असून आणखी तक्रारी वाढत आहेत.

एक आरोपी मुंबईत
लुईस हा मलेशियाला पळून गेला तर दुसरा आरोपी रोमजी बीन याला नाशिकमधून पोलिसांनी अटक केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हा असल्यामुळे शासकीय परवानगी घेऊन त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यास सांगितले. सध्या रोमजी हा जामिनावर बाहेर आल्यानंतर पसार झाला आहे.

Web Title: nagpur news crime