बंटी-बबलीला नागपुरात अटक

बंटी-बबलीला नागपुरात अटक

नागपूर - लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या नागपूरच्या पती-पत्नीला पुणे सायबर क्राइम शाखेने नागपुरातून अटक केली. आरोपींमध्ये किशोर चुडामण रामटेककर (३४) आणि त्याची पत्नी रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (२८, रा. विद्यानगर, वाठोडा, नागपूर) यांचा समावेश आहे.

अलीकडे तरुण मुले-मुली लग्नासाठी अनेक मेट्रोमोनी साईटवर त्यांची नावे नोंदवितात. त्यांना मेट्रोमोनी साईटवरील प्रोफाईलवरून लग्नाची मागणी आल्यावर त्यामध्ये सुंदर फोटो व चांगल्या नोकरीचे आमिष दाखविले जाते. लग्नाबाबत मोबाईलवर बोलणे व चॅटिंग करून भावनिकदृष्ट्या गुंतविण्यात येते. यानंतर एखादी घटना घडली असे भासवून वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव मोठ्या रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. अशाचप्रकारे या दोघांनी मुलांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. रामटेककर याने आपल्या पत्नीचे काव्या असलकर, पल्लवी असलकर या नावाने मेट्रोमोनी साईटवर नाव नोंदवून ठेवले होते.

सिंहगड रोड येथे राहणाऱ्या एका ३१ वर्षांच्या आयटी इंजिनिअरचा घटस्फोट झाला होता. त्याने पुनर्विवाहासाठी एका मेट्रोमोनीवर नाव नोंदविले होते. त्याच्याशी पल्लवी असलकर नावाच्या मुलीने संपर्क साधला दोघांचे एकमेकांशी फोन, व्हॉट्‌सॲप चॅटिंग सुरू झाले. तिने आपण झारखंड येथील रायगडला पीडब्ल्यूडीमध्ये नोकरीस असल्याचे व वडिलांचा सिव्हिल कन्स्ट्रक्‍शनचा व्यवसाय असल्याचे सांगितले.

एके दिवशी तिने वडिलांना हार्ट अटॅक आला असून पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. यानंतर तिने त्या तरुणाकडे २ लाख १५ हजार रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे या तरुणाने बॅंकेत पैसे भरले. त्यानंतर तिने वडिलांचे निधन झाल्याचे कळविले. नंतर या तरुणीचा फोन बंद झाला. त्याने रायगड येथे जाऊन चौकशी केल्यावर अशी कोणी तरुणी येथे काम करीत नसल्याचे सांगितले. संशय आल्याने त्याने सायबर क्राईमकडे तक्रार केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com