कोराडीत ट्रकभर गांजा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नागपूर - ओडिशातून हरियानात जाणारा ट्रकभर गांजा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोराडीत जप्त केला. या ट्रकमध्ये ३१५ किलो गांजा होता. ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला, तर ट्रकमालक सतीश कुमार (रा. सोनीपत-हरियाना) याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक हरियानाला रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम आणि सहायक आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रपरिषदेत दिली.

नागपूर - ओडिशातून हरियानात जाणारा ट्रकभर गांजा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोराडीत जप्त केला. या ट्रकमध्ये ३१५ किलो गांजा होता. ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला, तर ट्रकमालक सतीश कुमार (रा. सोनीपत-हरियाना) याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक हरियानाला रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम आणि सहायक आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ओडिशा राज्यात गांजा मुबलक प्रमाणात मिळतो. त्याच राज्यातून जवळपास देशभरात गांजा पुरविला जातो. एका ट्रकमध्ये (एचआर ६९-३७९०) ओडिशावरून गांजा येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली. त्यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत येईपर्यंत ट्रकवर वॉच ठेवला. हा ट्रक मध्यप्रदेशातील पांढूर्णा हद्दीतील बट चिंचोली गावातील एका ढाब्यावर थांबला होता. तेथील एका खबऱ्याने मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती निकम यांना दिली. त्यांनी ट्रकवर वॉच ठेवण्यास सांगितले. रात्रभर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथून ट्रक निघाला. खबऱ्याने ट्रकचा दुचाकीने पाठलाग सुरू केला. कोराडीत आल्यानंतर ट्रकचालकाला कुणीतरी पाठलाग करीत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने सावनेर ते नागपूर हायवे रोडवर कोराडी तलावाजवळ ट्रक उभा केला आणि पळ काढला. खबऱ्याच्या टीपवरून रविवारी सायंकाळी ट्रकवर एनडीपीएसच्या पथकाने नजर ठेवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुणीही न आल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. ट्रकमधून ४० लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई निरीक्षक राजेंद्र निकम, सहनिरीक्षक दिलीप चंदन, दत्ता बागुल, प्रवीण फांदाडे यांनी केली. 

ट्रकमध्ये गांजासाठी वेगळा कप्पा 
गांजाची तस्करी करण्यासाठी वेगळी शक्‍कल लढविण्यात आली होती. गांजा लपविण्यासाठी ट्रकच्या बेसमध्ये खोलगट भाग करून त्यावर प्लायवूड लावण्यात आले होते. प्लायवूडच्या खाली शेकडो किलो गांजाची वाहतूक करण्यात येत होती. वरवर पाहता ट्रक रिकामा वाटतो, मात्र, बारकाईने निरीक्षण केले असता गांजाची खेप दिसून येते.

पाळत ठेवल्यामुळे कारवाई 
पोलिसांनी शहरातून बाहेर राज्यात जाणाऱ्या गांजाच्या तस्करीवर पाळत ठेवली. महामार्गाने काही ट्रकने गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एनडीपीएस पथकाच्या कर्मचाऱ्यांनी परराज्यातील संशयित ट्रकची तपासणी करणे सुरू केले आहे. यातून खबऱ्याचे मोठे जाळे पोलिसांनी निर्माण केले. अनेक गांजा तस्कर पोलिसांच्या रडारवर आहेत.

Web Title: nagpur news crime Ganja seized