व्यापाऱ्यांना लावला दोन कोटींचा चुना 

व्यापाऱ्यांना लावला दोन कोटींचा चुना 

नागपूर - बनावट नावाने प्रतिष्ठान उघडून अण्णा गॅंगने प्रत्येक व्यापाऱ्याकडून लाखो रुपयांच्या साहित्याची उचल केली. व्यापाऱ्यांना धनादेशाद्वारे बिल चुकते केले. मात्र, ते धनादेश वटलेच नाहीत. अशाप्रकारे चेन्नईच्या अण्णा गॅंगने नागपुरातील जवळपास शंभरहून अधिक व्यापाऱ्यांना दोन कोटी रुपयांनी चुना लावल्याची घटना काल (ता. 25) उघडकीस आली. या प्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात 16 व्यापाऱ्यांनी अण्णा गॅंगविरुद्ध तक्रार अर्ज दिला. 

अण्णा गॅंगचा प्रमुख वेंकटेश सुब्रमण्यम असून तो चेन्नई येथील रहिवासी आहे. गेल्या जुलै महिन्यात तो टोळीसह नागपुरात आला. व्यापाऱ्यांना दिनेश जैन नावाने स्वतःचा परिचय करून देत होता. त्याने लकडगंजमध्ये भाड्याने गोदाम घेतले, तर भंडारी एंटरप्रायजेस नावाने दुकान उघडले. त्याने शहरातील अनेक व्यापाऱ्यांशी सपर्क साधला. यात प्लायवूड व्यापारी, फर्निचर व्यापारी, सन्मायका व्यापारी, कुलूप विक्रेते, भांडे व्यापारी, धान्य व्यापारी, लाकूड व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्याने ठोक साहित्य विकत घेत असल्याचा बनाव करीत लाखो रुपयांचा माल ट्रकमध्ये भरून लंपास केला. त्याने रोख रकमेऐवजी धनादेशाने पैसे दिले. फसविलेल्या व्यापाऱ्याकडून त्याच्या ओळखीच्या व्यापाऱ्याचा मोबाईल क्रमांक घेत होता. त्यानंतर त्यालाही अशाच प्रकारे फसवत होता. अशाप्रकारे लकडगंज, मानकापूर, मनीषनगर, नंदनवन, वाडी, अंबाझरी, सीताबर्डी आणि सदर परिसरातील मोठमोठ्या व्यापाऱ्यांना त्याने दोन कोटी रुपयांनी गंडा घातला. 

पोलिसांना दिला तक्रार अर्ज 
लकडगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी प्रशांत इंगळे नावाच्या व्यापाऱ्यासह 10 ते 12 व्यापारी लकडगंज ठाण्यात आले. त्यांनी 17 लाखांनी फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिला. चौकशीअंती अण्णा गॅंगवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वेंकटेश व्यवसायिकांना बनावट जीएसटी क्रमांक दाखवत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com