हम तो दिवाने हैं तुम्हारे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नागपूर - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटांमधील गाजलेल्या गाण्यांमागचा खरा खुरा आवाज आज नागपूरकरांपुढे प्रत्यक्ष अवतरला. या जादुई आवाजाचा धनी असलेला अभिजित भट्टाचार्य याने एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करून नागपूरकर रसिकांना थिरकायला भाग पाडले. 

नागपूर - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटांमधील गाजलेल्या गाण्यांमागचा खरा खुरा आवाज आज नागपूरकरांपुढे प्रत्यक्ष अवतरला. या जादुई आवाजाचा धनी असलेला अभिजित भट्टाचार्य याने एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करून नागपूरकर रसिकांना थिरकायला भाग पाडले. 

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दुसरा दिवस अभिजितच्या गोड स्वरांनी साजरा झाला. या वेळी केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अभिजितचा जाहीर सत्कार केला. "बादशहा'मधील गाण्याने अभिजितने स्टेजवर एन्ट्री घेतली आणि एकच जल्लोष झाला. त्यानंतर बहोत खुबसुरत हो, बडी मुश्‍कील है, बस इतना सा ख्वाब है, तौबा तुम्हारे ये इशारे आदी गाणी एकापाठोपाठ एक गाऊन अभिजितने माहोल केला.

जुन्या-नव्या संगीतावर भाष्य करताना अभिजित म्हणाला, पूर्वीच्या काळात संगीत ऐकले जात होते, आता ते बघितले जाते. दोन बोटे वर करून गाणं गाण्याची पद्धतही माझ्या समजण्यापलीकडची आहे. मी स्वतः लता, आशा, रफींची गाणी रेडिओवर ऐकून संगीत शिकलो. किशोर कुमार माझे गुरू आहेत, पण त्यांची कॉपी करण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. त्यानंतर मुसाफिर हुँ यारों, ओ माझी रे ही किशोरकुमार यांची लोकप्रिय गाणी सादर करून खास जुन्या पिढीतील रसिकांनाही खुश केले. प्रत्येक गाण्यानंतर रसिकांशी संवाद साधत, मिश्‍किली करीत अभिजितने साऱ्यांना खिळवून ठेवले. सुरुवातीपासून त्याला टन टनाटन टनटन टारा या गाण्यासाठी आग्रह होत होता. पण, ज्येष्ठ मंडळी समोर असताना गाणं योग्य वाटत नाही, असे तो सांगत होता. शेवटी नितीन गडकरी यांनी स्वतःच हात वर करून त्याला गाण्याची विनंती केली. या वेळी माजी मंत्री रणजित देशमुख, माजी खासदार दत्ता मेघे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी आदींची उपस्थिती होती.

कचौडी खिला दो
गिटारवादक मध्ये मध्ये कचौडी खिला दो अशी मागणी करीत होते. काल रात्री नागपुरात आल्यानंतर गडकरींच्या घरी अभिजितला मिळालेली कचोरी आणि जेवणाची मेजवानी कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेचा विषय होता. अभिजितने खाल्लेली कचोरी आपल्यालाही हवी आहे, अशी मागणी गिटारवादक करीत होते.

Web Title: nagpur news Cultural Festival