ऑइलच्या टॅंकमध्ये पडून मजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नागपूर - ऑइल टॅंकची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या एका मजुराचा मृत्यू  झाला. तर दोन मजुरांची प्रकृती गंभीर झाल्याची घटना कामठी मार्गावरील गोवर्धन एनर्जी केमिकल्स फॅक्‍टरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचा व्यवस्थापक आणि ठेकेदार यांना अटक केली. छोटू असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. 

नागपूर - ऑइल टॅंकची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या एका मजुराचा मृत्यू  झाला. तर दोन मजुरांची प्रकृती गंभीर झाल्याची घटना कामठी मार्गावरील गोवर्धन एनर्जी केमिकल्स फॅक्‍टरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचा व्यवस्थापक आणि ठेकेदार यांना अटक केली. छोटू असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. 

यशोधरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश हरीभाऊ महाजन, कपिल राजकुमार चांडक आणि राहुल उधोजी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. कामठी मार्गावरील नागलोकच्या गेटला लागूनच ही कंपनी आहे. मोठमोठ्या कंपन्यातील वेस्ट ऑइल खरेदी करून ते ऑइल कंपनीत आणले जाते. या ऑइलवर प्रक्रिया करून पुन्हा ते ऑइल कंपन्यांना विकले जाते. ऑइलचा साठा करण्यासाठी कंपनीच्या आवारातच जमिनीत मोठमोठे टॅंक बसविण्यात आले आहेत. मागील  अनेक दिवसांपासून टॅंकची साफसफाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीचा व्यवस्थापक अमित हरीभाऊ महाजन ((वय ४०, रा. जयस्तंभ, कामठी) यांनी प्रकाश नारायण लिल्हारे (३०) पार्वतीनगर, कळमना) या ठेकेदाराला ७ हजारांत टॅंकची सफाई करण्याचा ठेका दिला होता. 

ठेकेदार प्रकाशने जरीपटका येथील ठिय्यावरून हरीप्रसाद ऊर्फ राजू मेहत डेहरिया (३८), कृष्णकुमार झारीया (दोन्ही रा. गोपालगंज, सिवनी) आणि छोटू (रा. गोपालगंज, शिवनी-मध्य प्रदेश) या कामगारांना टॅंकची सफाई करण्यासाठी सोबत घेतले. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तिघेही मजूर साफसफाई करण्यासाठी टॅंकमध्ये उतरताच त्यांचा श्‍वास गुदमरल्याने बेशुद्ध होऊन टॅंकमध्ये पडले. ठेकेदार प्रकाशने आरडाओरड केल्याने कंपनीतील कामगार धावून आले. त्याचप्रमाणे अग्निशमन दल आणि यशोधरानगराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांनाही बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. हरीप्रसाद आणि कृष्णकुमार यांना कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये, तर छोटूला  रनाळा येथील लाइनलाइन दवाखान्यात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान छोटूचा मृत्यू झाला. छोटूचे पूर्ण नाव समजले नाही. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी ३०८ अन्वये गुन्हा नोंदवून व्यवस्थापक अमित महाजन आणि ठेकेदार प्रकाश लिल्हारे यांना अटक केल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur news death of the laborer falling into the oil tank