हिरेजडीत दागिन्यांची रेल्वेतून तस्करी!

जप्त रोख रकमेसह ज्योतिकुमार सतिजा व कारवाई करणारे पथक.
जप्त रोख रकमेसह ज्योतिकुमार सतिजा व कारवाई करणारे पथक.

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत ३० लाखांच्या रोख रकमेसह एकाला ताब्यात घेण्यात आले. ही हवालाची रक्कम असल्याचा संशय आहे. याशिवाय गुरुवारी सकाळी मुंबईहून नागपूर स्थानकावर दाखल झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत हिरेजडीत दागिन्यांसह एकूण ८०.२७ लाखांच्या आभूषणांसह एकाला ताब्यात घेण्यात आले. दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण १.१० कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे जवान विजय पाटील यांना दुरांतोमधून हवालाची रक्कम जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे बुधवारी रात्री ८.३५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांकवर उभ्या दुरांतोमध्ये छापा टाकण्यात आला. एस-७ डब्याच्या  बर्थ क्रमांक ५६ वर बसलेल्या महेंद्र नाजूकराव तरोडे (३१) रा. कुटासा, अकोला याच्यावर त्यांना शंका आली. त्याच्याकडे असलेल्या कॅरिबॅगची झडती घेतली असता दोन हजार आणि ५०० च्या नोटांचे अनेक बंडले बघून कारवाई करणाऱ्या पथकाचे डोळे उघडेच  राहिले. महेंद्रने तो इंद्रायणी कुरियर ॲण्ड लॉजिस्टिक सर्व्हिसेस कंपनीचा कर्मचारी असल्याचे आणि वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे कॅरिबॅग मुंबई येथील कार्यालयात पोहोचवून देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. पैशांसंबधी कोणतेही कागदपत्रे नसल्याने त्याला ताब्यात घेऊन एकूण ३० लाखांची रोखड जप्त करण्यात आली. 

सखोल चौकशीत महेंद्रनेच मुंबईहून निघालेल्या दुरांतोतून दागिन्यांची खेप येणार असल्याची माहिती मिळाली. ही गाडी गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर दाखल होताच नागपूरच्या पथकाने एस-७ कोचमध्ये बर्थ क्रमांक ४९ वर असलेल्या श्‍याम बंकूवाले (३८) रा. अकोला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता ७८.७६ लाख रुपये किमतीचे २ किलो ३०९ ग्रॅम सोन्याचे आणि २९.७५ कॅरेज हिऱ्याचे दागिने तसेच १लाख ५१ हजार रुपये किमतीचे एकूण ३ किलो ६०१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळले. श्‍याम हासुद्धा इंद्रायणी कुरियर ॲण्ड लॉजिस्टिक सर्व्हिस कंपनीचा कर्मचारी आहे. त्याच्याकडेही दागिन्यांशी संबंधित कागदपत्रे नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

तपास आयकर विभागाकडे वर्ग
गुजरात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच मोठ्या प्रमाणावर रोकड आणि दागिने आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण झाली. हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने  आयकर विभागाला सूचना देण्यात आली. दोन्ही प्रकरणांचा तपास आयकर विभागाच्या अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, आयकर विभागाचे संयुक्त संचालक प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com