डॉक्‍टरांच्या निलंबनाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - मेडिकलच्या नेत्रविभागात दोन महिन्यांपूर्वी रुग्णाकडून तीन हजार रुपयांची  लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन डॉक्‍टरांना पकडले होते. या प्रकरणात दोन्ही डॉक्‍टरांना दोषी ठरवले असून, लाचलुचपत खात्याने या प्रकरणातील डॉक्‍टरांचे कायद्यानुसार निलंबन करावे, असे आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिले असल्याची माहिती  पुढे आली आहे.  

नागपूर - मेडिकलच्या नेत्रविभागात दोन महिन्यांपूर्वी रुग्णाकडून तीन हजार रुपयांची  लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन डॉक्‍टरांना पकडले होते. या प्रकरणात दोन्ही डॉक्‍टरांना दोषी ठरवले असून, लाचलुचपत खात्याने या प्रकरणातील डॉक्‍टरांचे कायद्यानुसार निलंबन करावे, असे आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिले असल्याची माहिती  पुढे आली आहे.  

डोळ्यांतील रक्तवाहिन्यांमधील गाठ, रेटिनावरील संसर्गावर ‘ॲव्हेस्टिन’ हे इंजेक्‍शन आवश्‍यक आहे. शासनाकडून ‘ॲव्हेस्टिन’ इंजेक्‍शनचा पुरवठा होत नाही. रुग्णांनाच ते खरेदी करावे लागते. या इंजेक्‍शनची किंमत २४ हजारांवर आहे. एक इंजेक्‍शन आठ भागांत विभाजित करता येत असल्याने ३ हजार रुपये प्रत्येक रुग्णाकडून घेतले जातात, असे चौकशी अहवालातून पुढे आले. 

मात्र, रुग्णांकडून अशाप्रकारे पैसे घेता येत नाही, हा अवैध प्रकार असून कायद्यानुसार डॉ. वंदना अय्यर आणि डॉ. स्वानंद प्रधान या दोन्ही डॉक्‍टरांना निलंबित करावे असे आदेश बुधवारी लाचलुचपत खात्याने मेडिकल प्रशासनाला पत्राद्वारे कळविले. विशेष म्हणजे, रुग्णहितासाठी ही तात्पुरती सोय असली तरी ही खरेदी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचा निष्कर्ष मेडिकलच्या वरिष्ठ डॉक्‍टरांच्या चौकशी समितीने अहवालात नोंदविला होता. 

प्रकरण न्यायालयात 
हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेडिकल प्रशासनाला पाठवलेले पत्र या डॉक्‍टरांसाठी अडचणीचे ठरू शकते. मेडिकलच्या चौकशी समितीने दोन्ही डॉक्‍टरांनी स्वीकारलेली ३ हजार रुपयांची रक्कम लाच नव्हती, असे मत चौकशी समितीने नोंदविले. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. विद्यार्थी या कायद्याच्या कक्षेत थेट येत नाही. या प्रकरणातील एक जण निवासी डॉक्‍टर असल्याने या विद्यार्थ्यावर कारवाईचे अधिकार मेडिकल प्रशासनाला आहेत. यासंदर्भात गुरुवारी मेडिकलमध्ये बैठक घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

रुग्णहितासाठी सोय होती. मात्र, खरेदी प्रक्रिया चुकीची होती, असा अहवाल चौकशी समितीने वैद्यकीय शिक्षण विभागापासून तर न्यायालयातही सादर केला तसेच लाचलुचपत विभागालाही दिला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून दोन्ही डॉक्‍टरांच्या निलंबनासंदर्भात पत्र  आले. कॉलेज कौन्सिलमध्ये चर्चा झाली. गुरुवारी बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल. 
डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: nagpur news doctor medical