चार तासांत डॉक्‍टरची बदली रद्द

चार तासांत डॉक्‍टरची बदली रद्द

नागपूर - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघ असलेल्या जळगावात नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होत आहे. येथील वैद्यक परिषदेच्या निरीक्षणासाठी राज्यातील सर्वच मेडिकल कॉलेजमधून डॉक्‍टरांची आयात करण्याचा फंडा शासनाने सुरू केला आहे. विशेष असे की, मुंबईच्या ग्रॅंट हास्पिटलमधील एका पॉवरफुल डॉक्‍टरची जळगावात बदली झाली. मात्र, अवघ्या चार तासांत ही बदली रद्द करण्यात आली असून, दुसऱ्याची वर्णी येथे लावण्यात आली असल्याचा अफलातून प्रकार पुढे आला आहे.   

जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी २०१८-१९ या वर्षाला भारतीय वैद्यक परिषदेची मान्यता मिळवण्यासाठी निरीक्षण होणार आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूर, यवतमाळ, अकोला, नांदेड, औरंगबादसह इतर शहरांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्‍टरांच्या बदल्यांचे धोरण सुरू केले. एकाच दिवशी २५ जानेवारी २०१८ रोजी विविध मेडिकल कॉलेजमधून सुमारे २० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांच्या (डॉक्‍टर) बदली करण्यात आल्या आहेत. विशेष असे की, मुंबईतील ग्रॅंट हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. मुकुंद तायडे यांची जळगाव येथे बदली झाली. मात्र, ते रुजू झाले नाही. त्यांची चार तासांत बदली रद्द करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. 

बदली झालेल्या डॉक्‍टरांमध्ये डॉ. मुकुंद तायडे, डॉ. अविनाश सजगाने, डॉ. सुरभी मुंदडा (मुंबई) डॉ. कल्पना कुलकर्णी, डॉ. सुनीता खाडे (पुणे), डॉ. सुनील बैसारे (मुंबई), डॉ. प्रभाकर जिरवणकर (औरंगाबाद), डॉ. ऋती ढाले (मुंबई), डॉ. सचिन मुळकुटकर (मुंबई), डॉ. बाबा येलके, डॉ. हेमंत म्हात्रे (यवतमाळ), डॉ. एस. आर. वाकोडे (नांदेड), डॉ. कल्पना राठोड, डॉ. स्मिता पाटणकर, डॉ. तेजस्विनी पिंगळे (पुणे), डॉ. भूपेंद्र पाटील (अकोला), डॉ. विजय इंगळे (सोलापूर), डॉ. अनिता तन्नमवार (कोल्हापूर), 
डॉ. गुरव (मीरज) यांची एकाच दिवशी बदली करण्यासंदर्भातील अद्यादेश जारी करण्यात आला. 

रिक्त पदे भरा  
विदर्भात जी काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. मेयोत एमआरआय नसल्याने एमडीच्या जागा धोक्‍यात आल्या आहेत. चंद्रपूर, गोंदिया, अकोला, यवतमाळात रिक्त पदे भरली नाहीत. यामुळे चंद्रपूर, गोंदियाची मान्यता भविष्यात धोक्‍यात येऊ शकते, तसा एमसीआयने ठपका ठेवला आहे. विदर्भातील मेडिकल कॉलेजची परिस्थिती सुधारण्याचे सोडून नव्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्र्यांच्या जळगावात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्यभरातील डॉक्‍टरांना अवेळी बदलीचा डोस वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून देण्यात आला आहे. सर्वच मेडिकल कॉलेजमध्ये असंतोष पसरला आहे. 

वैद्यकीय परिषदेत मिळाला बदली आदेश 
डॉ. मुकुंद तायडे यांची बदली रद्द करण्यात आल्यानंतर मीरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. गुरव यांची जळगावात बदली करण्यात आली. मात्र, डॉ. गुरव हे मीरजमध्ये उपस्थित नव्हते. ते मुंबई येथे मेडिकल कॉन्फरन्समध्ये होते. तेथे त्यांच्या हाती बदलीचे आदेश देण्याचा अफलातून प्रकार घडला. बिच्चारे डॉ. गुरव मुंबईहून थेट जळगावला पोहोचले. हा पारदर्शक शासनाचा उत्तम नमुना असल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com