ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नितनवरे कालवश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नागपूर - विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, ‘युगवाणी’चे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल नितनवरे (वय ५२) यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. अगदी कालपर्यंत सर्वांच्या संपर्कात असलेले अनिल नितनवरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच, साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होऊ लागली. त्यांच्या पश्‍चात आईवडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवार) दुपारी १२ वाजता नागपुरातील जयताळा येथील निवासस्थानावरून निघेल. 

डॉ. अनिल नितनवरे साकोलीतील एम. बी. पटेल महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक  म्हणून कार्यरत होते. आज सकाळी महाविद्यालयात असतानाच त्यांना छातीत दुखायला लागले. त्यांना उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव काही वेळ भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवले व त्यानंतर रात्री नागपुरातील घरी आणण्यात आले. साकोलीतील नोकरीमुळे ते भंडारा येथे पत्नी व मुलांसोबत राहायचे. तर नागपुरात जयताळा येथे त्यांचे आईवडील वास्तव्यास असतात.

विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, साहित्य चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व तसेच उत्तम व मितभाषी मित्र गमावल्याची भावना साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे. ‘युगसंवाद’ या साहित्य चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील साहित्यिकांना त्यांनी जोडले. विविध कविसंमेलनांचे आयोजन केले. कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्यासोबत ‘कवी आणि कविता’ या उपक्रमाच्या माध्यमातून दिग्गज कवींच्या मुलाखतींचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. विविध जिल्हा व युवा संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अलीकडेच वणी (जि.यवतमाळ) येथे झालेल्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनात त्यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. प्रा. दिलीप अलोणे यांच्याकडेच त्यांचा मुक्काम होता. गेल्याच आठवड्यात विदर्भ साहित्य संघाच्या ९५ व्या वर्धापनदिन सोहळ्याला ते उपस्थित होते. ‘सकाळ’मध्ये काहीकाळ त्यांनी  ‘मेंदी’ या नावाचे स्तंभलेखनही केले. सर्वांशी सातत्याने संपर्कात राहणारे आणि नव्या-जुन्या साहित्यिकांशी कायम नम्रतेने संवाद साधणारे डॉ. अनिल नितनवरे यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

स्टाफरूममध्येच कोसळले
सकाळी कॉलेजमध्ये गेल्यावर डॉ. अनिल नितनवरे यांनी पहिला तास घेतला. तास घेतल्यानंतर ते स्टाफरूममध्ये आले. काही क्षण बसल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुणालातरी आवाज देऊन सांगणार तोच ते खाली कोसळले. महाविद्यालयातील सहकारी तातडीने धावून आले आणि रुग्णालयात भरती केले.

Web Title: nagpur news dr anil nitnavare death