शहरातील विहिरींचे पाणी पिणे झाले धोक्‍याचे 

मंगेश गोमासे
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - कमी पाऊस आणि दिवसेंदिवस खालावत चाललेल्या भूजल पातळीसोबतच जलस्रोतांच्या प्रदूषणाचा विषयही चिंतेचा विषय ठरत चालला आहे. प्रदूषणामुळे शहरातील पाण्याच्या स्रोतांमध्ये "नायट्रेट'चे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा अधिक वाढल्याने याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. व्हीएनआयटीच्या संशोधकांनी केलेल्या तपासणीत जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आले आहे. 

नागपूर - कमी पाऊस आणि दिवसेंदिवस खालावत चाललेल्या भूजल पातळीसोबतच जलस्रोतांच्या प्रदूषणाचा विषयही चिंतेचा विषय ठरत चालला आहे. प्रदूषणामुळे शहरातील पाण्याच्या स्रोतांमध्ये "नायट्रेट'चे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा अधिक वाढल्याने याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. व्हीएनआयटीच्या संशोधकांनी केलेल्या तपासणीत जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आले आहे. 

नागपुरातील भूजल प्रदूषण मोजण्यासाठी विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थानातील स्थापत्य अभियांत्रिकीतील सहयोगी अधिव्याख्याता डॉ. अविनाश डी. वासुदेव यांच्या मार्गदर्शनात रिसर्च स्कॉलर असलेल्या सहजप्रित कौर गरेवाल हिने शहरातील 45 विहिरीमधील पाण्यामधील नमुन्यांचा अभ्यास केला. त्यातून मिळालेल्या डाटांचा "ड्रास्टीक मेथड' म्हणजे पाण्याची पातळी, "रिचार्ज, अक्‍वीफायर मीडिया, सॉईल मीडिया, टोपोग्राफी, इम्पॅक्‍ट ऑफ वाडोस झोन, हायड्रोलिक कनेक्‍टिव्हीटी' या माध्यमातून संशोधन केले. या संशोधनातून पूर्व नागपुरातील जवळपास 15 विहिरीतील पाण्यात "नायट्रेट'चे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा अधिक आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे पूर्व नागपुरात असलेल्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड आणि इंडस्ट्रीअल एरिया यामुळे येथील पाण्यात "नायट्रेट'चे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा अधिक आहे. यामध्ये साधारणत: वाठोडा, पारडी, कळमना आणि त्यालगत असलेल्या परिसरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शहरातील 30 टक्के भूजल पाणी प्रदूषित असून ते धोक्‍याच्या पातळीवरील आहे. दक्षिण-पश्‍चिम भागात शहरातील एकूण भूजल प्रदूषणापैकी 32 टक्के तर 38 टक्के भूजल प्रदूषण पूर्व आणि उत्तर या भागात असल्याचे दिसून येते. यामध्येही पूर्व नागपूरचा वाटा जास्त आहे. ही बाब बरीच संवेदनशील असून येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

काय होऊ शकते 
नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने रक्तातील ऑक्‍सिजनचे वहन क्षमता कमी होते. श्‍वसनाचे आजार होऊ शकतात. पोट फुगणे, पोटाचे विकार तसेच कॅंसरचाही धोका. प्राण्यांसाठी सर्वाधिक धोकादायक. 

तपासणीनुसार आढळून आलेले तथ्थ बरेच संवेदनशिल आहे. पावसाळ्यात जल पुनर्भरण होताना, त्याचे प्रमाण अधिक वाढण्याचाही धोका आहे. त्यामुळे यासंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
- सहजप्रित कौर गरेवाल,  रिसर्च स्कॉलर, व्हीएनआयटी.

Web Title: nagpur news Drinking water from the wells in the nagpur city is a danger