डम्पिंग यार्डच्या धुरात धुमसते संतापाची ‘आग’

डम्पिंग यार्डच्या धुरात धुमसते संतापाची ‘आग’

नागपूर - अनेक वर्षांपासून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड हटविण्याच्या मागणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांत संतापाची ‘आग’ धुमसते आहे. काही दिवसांपासून सातत्याने डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला आग लागत असून, भांडेवाडी परिसरातील अनेक वस्त्या धुराने त्रस्त झाल्या आहेत. गुरुवारी दुपारीही डम्पिंग यार्डमध्ये आग अन्‌ त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नातील अग्निशमन विभागाचा बंब असे दृश्‍य दिसून आले. अनेक निवेदने देऊनही महापालिकेला भांडेवाडीचा पर्याय शोधण्यात आलेले अपयश नागरिकांच्या संतापात भर टाकणारे असून, औरंगाबादप्रमाणे या परिसरातही रागाची आग धुमसत आहे.

भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डची कचरा साठविण्याची मर्यादा संपुष्टात आली असून, कत्तलखाना परिसरात शहरातील कचरा गोळा करण्यात येतो. येथेही कचऱ्याचे ढिगारे लागले असून, काही दिवसांत तेही संपूर्णपणे कचऱ्याने व्यापल्यानंतर काय, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यात महापालिकेला अद्याप यश आले नाही. पावसाळ्यात दुर्गंधी व कचऱ्याच्या वाहनांमुळे रस्त्यांची दुर्दशा अशा समस्येने त्रस्त भांडेवाडीवासींना उन्हाळा लागताच डम्पिंग यार्डमधील आगीतून निघणाऱ्या विषारी धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

महिनाभरापासून डम्पिंग यार्डमध्ये दररोज आगीच्या घटना घडत आहेत. धुराने परिसरातील पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, सावननगर, साहिलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, मेहरनगर, वाठोडासह एक किमी परिघातील वस्त्यांतील नागरिक त्रस्त आहेत. शहरातून दररोज गोळा केलेला १,२०० टन कचरा येथे आणला जातो. महापालिकेकडे कचरा साठविण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने असलेला कचरा जाळून येणाऱ्या कचऱ्यासाठी जागा तयार करण्यात येत असावी, अशी शक्‍यता परिसरातील नागरिकांनी वर्तविली.

एकप्रकारे अप्रत्यक्षपणे महापालिकाच आग लावते, असा त्यांचा रोख होता. आणखी किती काळ, हा त्रास सोसावा? धुरामुळे मुलांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्यावर किती खर्च करायचा? असे अनेक सवाल नागरिकांनी उपस्थित केले. ‘आता या परिसरात कचऱ्याच्या वाहनांना रोखून धरण्याचीच वेळ आली’ असे नमूद करीत परिसरातील नागरिकांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्‍नही औरंगाबादप्रमाणे पेटण्याचे सूतोवाच केले.

आरोग्य सभापतींचे आश्‍वासन हवेत
मागील वर्षी ११ एप्रिलला डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला आग लागली होती. आगीच्या घटनांनी त्रस्त परिसरातील महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. महिलांच्या आंदोलनाला सामोरे जात आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, एक वर्ष होऊनही त्यांच्याकडून किंवा महापालिका प्रशासनाकडून कुठलीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

हजारोंचे आरोग्य धोक्‍यात
डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीतून डायऑक्‍सिन्स व फ्युरेन्ससारखे गॅसही निघत असून, रहिवाशांना कॅन्सरचा धोका आहे. सततच्या आगीमुळे कार्बन मोनोक्‍साइड, नायट्रोजन मोनोक्‍साइड, सल्फर ऑक्‍साइड, हायड्रोक्‍साइड ॲसिड, पॉली अएरोमॅटिक हायड्रोकार्बनसारखे विषारी वायू वातावरणात पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांना दमा, डोळ्यांचे आजार, खाज, गजकर्णासारखे आजार होण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

का वाढतोय संताप?
आतापर्यंत झालेल्या आंदोलनात महापालिकेने डम्पिंग यार्ड हटविण्याचे आश्‍वासन देत केवळ वेळ मारून नेली.
डम्पिंग यार्डच्या समस्येमुळे अनेकांवर घर विकून बाहेर जाऊन भाड्याने राहण्याची वेळ आली.
सतत घरातील सदस्य आरोग्याच्या समस्येने त्रस्त असून, उपचारांवरच निम्मी कमाई खर्च होत आहे.

कसे पेटले औरंगाबाद?
औरंगाबादनजीकच्या नारेगावमध्ये असलेल्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केला.
औरंगाबाद महापालिकेने शहराच्या दुसऱ्या भागात कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रयत्न केला. तेथील नागरिकांनीही विरोध केला.
अशीच एक दिवस दहा वाहने कचरा घेऊन जाताना नागरिकांना दिसली. नागरिकांनी दगडफेक केली अन्‌ उग्र आंदोलनाची ठिणगी पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com