दानवीर खडसेंना काँग्रेसची ‘ऑफर’

दानवीर खडसेंना काँग्रेसची ‘ऑफर’

नागपूर - विधिमंडळाच्या अधिवेशनात माजी मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे त्यांच्या वक्तव्यावरून सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पहिल्या आठवड्यात अजित पवारांच्या प्रश्‍नांवरून स्वपक्षातील मंत्र्यांलाच अडचणीत आणणारे एकनाथ खडसे यांना सोमवारी काँग्रेस सदस्य यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. ठाकूर यांच्या ऑफरला खडसे यांनी येईल ना अशी साद दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत पशुवैद्यकीय महाविद्यालये तोकडे आहेत. त्यासाठी सरकारने शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातील जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. ही मागणी करताच त्यांनी गावाला लागून शंभर एकर जागा विनामूल्य पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी दान केल्याचे सभागृहात सांगितले. 

पुढील वाक्‍य बोलण्यापूर्वीच काँग्रेस सदस्य यशोमती ठाकूर यांनी मध्येच ‘एवढा दिलदार माणूस आमच्या पक्षात नाही’, अशी कोटी केली. यावर इतर सदस्यांनीही आमच्या कडे या, असे आमंत्रण त्यांना दिले. लगेच खडसे यांनी ‘येईल ना’ असा प्रतिसाद दिल्याने सभागृहात खळबळ उडाली. मात्र, लगेच त्यांनी भाजपसाठी ४० वर्षे परिश्रम घेऊन सत्ता आणली. आता पक्ष सोडता येणार नाही, असे नमूद करीत ‘ऑफर’ शांतपणे नाकारली. चर्चेतही स्वपक्षातील मंत्र्यांचीच कोंडी करणाऱ्या खडसे यांनी सकाळी प्रश्‍नोत्तरांच्या तासात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्‍नावरून गिरीश बापट यांनाही अडचणीत आणले.

बापट यांना धारेवर धरले
पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या हाफकीन महामंडळाच्या प्रश्‍नावर त्यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मुक्ताईनगर येथील पाणी प्रश्‍नांवर मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरही तोंडसुख घेतले. प्रशासकीय मान्यतेसाठी पाच महिन्यांचा वेळ लागतो काय, असा प्रश्‍नही विचारून हे राज्य आहे की काय आहे, अशी उपरोधिक टीकाही केली. राष्ट्रवादीचे शशीकांत शिंदे यांच्या लक्षवेधीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करीत कृषिपंपाच्या वाटपाबाबत शासनाचा धोरणावर बोट ठेवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com