अभियांत्रिकी युवकांच्या सेवाधर्माला सलाम

नागपूर - मनोरुग्णालयातील सोलर पॅनलची स्वच्छता करताना अभियांत्रिकीचे युवक.
नागपूर - मनोरुग्णालयातील सोलर पॅनलची स्वच्छता करताना अभियांत्रिकीचे युवक.

नागपूर - मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी आठ सोलरची सोय केली. परंतु हे सर्व सोलर बंद असल्याने ‘मनोरुग्णांच्या नशिबी थंड पाणी’ असे वृत्त दै. ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. मात्र ही समस्या सोडवण्यासाठी सामाजिक बांधीलकी जोपासणारे उपराजधानीतील ‘एक पहल’ हे संघटन पुढे सरसावले. संस्थेतील तरुण अभियंत्यांनी सामाजिक भान ओळखून कार्यालयीन कामकाजावर कोणताही फरक न पडू देता जेवणाच्या सुटीचा वेळ मनोरुग्णांच्या सेवेसाठी सत्कर्मी लावला. एक-दोन, तीन नव्हे तर सहा सोलर वॉटर हिटर दुरुस्तीचे काम अल्पावधीत पूर्ण केले. आता मनोरुग्णांना गरम पाणी मिळत आहे. प्रशासनालाही यातून मोठा दिलासा मिळाला आहे. 

सात वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून मनोरुग्णालयात आठ सोलर वॉटर हिटर लावण्यात आले होते. पुण्याच्या एका कंपनीकडे याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली. परंतु कंपनीकडून दुर्लक्ष झाले. आठ सोलरपैकी केवळ एकच सोलर सुरू होते. उर्वरित सारे सोलर बंद होते. यामुळे मनोरुग्णांना गरम पाणी मिळत नव्हते. थंड पाणी अंगावर घ्यावे लागत होते. हिवाळा तोंडावर आल्याने रुग्णालय प्रशासनही हतबल झाले. अचानक नागपुरातील ‘एक पहल’ सामाजिक संस्थेचे आठ युवक एकत्र आले. त्यांनी सोलर दुरुस्ती करून देण्याचा विश्‍वास दाखवला आणि दुरुस्तीचा एक पैसाही न घेता सहा सोलर वॉटर हिटर दुरुस्त केले. यामुळे मनोरुग्णांना पुन्हा गरम पाणी मिळू लागले.  

‘एक पहल’चे कार्यकर्ते 
भोजनाच्या सुटीचा रोज एक तास आणि रविवारचा पूर्ण दिवस देत अमित देवतळे, विजय यादव, नीरज सहारे, पंकज सहारे, विनोद कानफाडे, स्वप्निल बंड, सचिन भिसीकर व पुनित कारमिलकर या तरुण अभियंत्यांनी सहा सोलर वॉटर हिटर दुरुस्त केले. यामुळे मनोरुग्णांना गरम पाणी मिळत आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयातील सोलर वॉटर हिटर बंद होते. वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अभियांत्रिकी युवकांनी एकत्र येऊन सामाजिक जाणिवेतून हे काम केले. विशेष असे की, एक पैसाही न घेता काम पूर्ण केले. प्रत्येक युवकांनी अशी कौतुकास्पद सामाजिक बांधीलकी निभवावी. मनोरुग्णांना सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे.  
- डॉ. आर. एस. फारुखी वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

मनोरुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नसल्याचे वृत्त वाचनात आले. यानंतर ‘एक पहल’च्या माध्यमातून सुरुवातीला डॉ. फारुखी यांच्याशी नंतर सोलर कंपनीशी संपर्क साधला. विस्तृत माहिती घेतली. यानंतर आम्ही युवकांनी हे काम केले. सेवाभावी वृत्ती प्रत्येकात असते. सकारात्मक दृष्टिकोन असला की सहज सामाजिक भान निर्माण होते. 
- विजय यादव, एक पहल, सामाजिक संघटन, नागपूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com