मनोरुग्णालयात बनावट ‘लेटरहेड’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी  येणाऱ्या मनोरुग्णांना औषध विक्रीतून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण नुकतेच उजेडात आले. याप्रकरणी चौकशी समितीने घोटाळा करणाऱ्या राजकुमार डोमळेला निलंबित केले. अशा अनेक घटनांमुळे मनोरुग्णालय गाजत असताना आता मनोरुग्णालयात बनावट लेटर हेड वापरले जात असल्याचे सांगितले जाते.  

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी  येणाऱ्या मनोरुग्णांना औषध विक्रीतून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण नुकतेच उजेडात आले. याप्रकरणी चौकशी समितीने घोटाळा करणाऱ्या राजकुमार डोमळेला निलंबित केले. अशा अनेक घटनांमुळे मनोरुग्णालय गाजत असताना आता मनोरुग्णालयात बनावट लेटर हेड वापरले जात असल्याचे सांगितले जाते.  

प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचारी प्रशांत देशमुख यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण होता, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचारी संघटनेच्या लेटर हेडवर प्रसार माध्यमाकडे देण्यात आली. मात्र, या संघटनेतर्फे तक्रार करण्यात आली नसल्याचे उघड झाले असून, ‘लेटर हेड’चा गैरवापर करण्यात आला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष वामन लंगडे यांनी सांगितले.  

मनोरुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांवर येतो. यामुळे मनोरुग्णालयातील कर्मचारी तणावाखाली असून, त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली होती. विशेष असे की, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सात पदांसह मनोरुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांवर आहे. चतुर्थश्रेणी परिचरांची सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत. प्रशासनातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सहायक अधीक्षकाची २, वरिष्ठ लिपिकाची २, कनिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, पर्यवेक्षक, अधिसेविकाच्या रिक्त जागा भरलेल्या नाहीत. मनोरुग्णांना हाताळण्यासाठी मनोरुग्ण परिचारिकांच्या ४, अधिपरिचारिकांचा २ आणि प्रमुख परिचरांच्या यांच्या ४ जागा रिक्त आहेत. एकूण ७० पदे रिक्त असल्याची तक्रार प्रधान सचिव यांच्या नावाने मुंबईला पाठवण्यात आली. तर आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जैयस्वाल यांच्यासंदर्भात ही तक्रार देण्यात आली. मुळात ही तक्रार बनावट असून याच्याशी संघटनेचा कोणताही संबंध असल्याचे लंगडे यांचे म्हणणे आहे. 

पालकमंत्र्यांनाही प्रतिलिपी 
प्रधान सचिवांकडे आरोग्य उपसंचालकांची तक्रार या बनावट लेटर हेडवर तक्रार दिली आहे. या तक्रारीची प्रतिलिपी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत तसेच  आरोग्य संचालक यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.

Web Title: nagpur news Fake letterhead psychiatric hospital