शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरीपुत्रांचा "अन्नत्याग'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नागपूर - चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कर्जामुळे पत्नी व चार मुलांसह केलेल्या आत्महत्येला 31 वर्षे पूर्ण झाली. त्या घटनेच्या स्मृत्यर्थ शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी (ता. 19) करपे यांचे मूळगाव चिलगव्हाणसह विदर्भात विविध ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

चिलगव्हाण येथे साहेबराव करपे यांच्या कटू स्मृतींना उजाळा देत गावातील एकाही घरातील चूल पेटली नाही, तर प्रत्येकाच्या घरासमोर काळी रांगोळी काढण्यात आली. गावकऱ्यांनी काळी फीत बांधून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. अंबोडा (ता. महागाव) येथील आंदोलनाच्या सुरवातीला दिवंगत शेतकरी साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नेर तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले. नेर तालुक्‍यात पेरणीबंद आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या सातेफळ येथे प्रत्येक घराच्या दारात पांढरी रांगोळी काढून त्यात शासकीय व्यवस्थेचा निषेध म्हणून काळे ठिपके काढण्यात आले. यवतमाळ येथील तिरंगा चौकातील आंदोलनात सुकाणू समिती तथा महाराष्ट्र राज्य किसान सभा व किसानपुत्र आंदोलन समितीने सहभाग घेतला. वणी येथे अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी सुकाणू समितीतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले.

अमरावती जिल्ह्यातील अमरावती, परतवाडा, वरुड, मोर्शी, अंजनगाव, दर्यापूर येथील विविध संघटना व पक्षांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

भंडारा येथे किसान सभेच्या नेतृत्वातील शेतकरी मोर्चाच्या मागण्यांची तत्परतेने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आज अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. वर्धा जिल्ह्यात विविध संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर आणि वरोरा येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरातील गांधी चौकात सकाळी अन्नत्याग आंदोलनास सुरवात झाली.

Web Title: nagpur news farmer annatyag agitation