'शेतकरी मृत्यूला कृषी खातेच जबाबदार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर - बंदी असलेली कीटकनाशके बाजारात आल्याने शेतकऱ्यांचा बळी गेला. फवारणीमुळे झालेल्या मृत्यूस केंद्रीय कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आपण कृषिमंत्री असताना कधीही बंदी घातलेली कीटकनाशके बाजारात येऊ दिली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

नागपूर - बंदी असलेली कीटकनाशके बाजारात आल्याने शेतकऱ्यांचा बळी गेला. फवारणीमुळे झालेल्या मृत्यूस केंद्रीय कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आपण कृषिमंत्री असताना कधीही बंदी घातलेली कीटकनाशके बाजारात येऊ दिली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

अमरावती येथे सत्कार कार्यक्रमाला जाताना शरद पवार यांनी सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी  त्यांनी कृषी मंत्रालयाच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. गेल्या एक-दोन वर्षातच बाजारात बंदी असलेली कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागली आहेत. ती कशी बाजारात आली आणि त्यास कोणी मंजुरी दिली याचीही चौकशी झाली पाहिजे. यावर नियंत्रणासाठी कायदा आणि स्वतंत्र व्यवस्था आहे. पण, त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नसल्याने यास संपूर्णपणे कृषी मंत्रालयच दोषी आहे, असेही ते म्हणाले.

आमच्याही काळात फवारण्या झाल्या, मात्र त्यामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही. आत्ताच हे घडायला लागले आहे. विनाप्रमाणित कीटकनाशके बाजारात आल्याने हे घडायला लागले आहे. परतीच्या पावसाचा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले. राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चुकीचे नियोजन केले. नियोजनाशिवाय कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. मात्र, सरकारला आपण आणखी १५ दिवसांचा वेळ देणार आहोत. यानंतरही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर पुढची भूमिका ठरवू, असा इशाराही यावेळी शरद पवार यांनी दिला. उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबाबत विचारणा केली असता तो माझा विषय नाही असे सांगून शरद पवार यांनी बोलायचे टाळले.

तत्पूर्वी विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, शहराचे कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: nagpur news farmer sharad pawar