महाबीजविरुद्ध शेतकऱ्यांची तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - महाबीजचे ९५६० व ९३०५ प्रजातीचे सोयाबीनचे बियाणे ३० टक्केच उगविल्याने शेतकऱ्यांवर हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत महाबीजविरुद्ध तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर - महाबीजचे ९५६० व ९३०५ प्रजातीचे सोयाबीनचे बियाणे ३० टक्केच उगविल्याने शेतकऱ्यांवर हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत महाबीजविरुद्ध तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला नागपूर विभागातील शेतकऱ्यांनी महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची खरेदी केली. तर काही शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदानावरून बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. एकट्या नागपूर जिल्ह्यात या दोन्ही प्रजातींच्या १२ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे शेतकऱ्यांना अनुदानावर वाटप करण्यात आले. तीन हजार क्विंटल बियाण्यांची शेतकऱ्यांनी स्वत: कृषी केंद्रावरून खरेदी केली. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दोन्ही प्रजातीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली.

 पण, नागपूर आणि पारशिवनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी महाबीजच्या या प्रजातीच्या बियाण्यांची पेरणी केल्यानंतर केवळ ३० टक्केच बियाणे उगविले. हाच प्रकार जिल्ह्यातील इतरही तालुक्‍यात घडल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्याकडे तक्रार केली. 

सोयाबीनच्या या दोन्ही प्रजातींच्या बियाण्यांची तपासणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांच्याकडे तक्रार केली. त्याचीच दखल घेत या दोन्ही प्रजातीच्या सोयाबीन बियाण्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात तीन ठिकाणाहून सोयाबीन बियाण्यांच्या दोन्ही प्रजातीचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर.

विद्यापीठाच्या तज्‍ज्ञांकडून पाहणी
महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्यानंतर कृषी विद्यापीठाच्या तज्‍ज्ञांनी तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीनची पाहणी केली. तसेच बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. तज्‍ज्ञांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर याचा अहवाल महाबीजकडे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: nagpur news farmer soyabean