फूटपाथवर कचरा टाकल्यास दंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - शहरातील फूटपाथ, रस्ता, मोकळ्या जागेवर कचरा टाकून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर धोरण तयार केले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फूटपाथवर कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये पथक तयार करण्यात येणार आहे. कचरा करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार पथकाला देण्यात येणार असून, कचरा टाकणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. 

नागपूर - शहरातील फूटपाथ, रस्ता, मोकळ्या जागेवर कचरा टाकून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर धोरण तयार केले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फूटपाथवर कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये पथक तयार करण्यात येणार आहे. कचरा करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार पथकाला देण्यात येणार असून, कचरा टाकणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. 

‘सकाळ’ने २२ मेपासून आठवडाभर शहरातील फूटपाथची दूरवस्था, त्यावरील अतिक्रमण, कचऱ्याबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. शहरातील फूटपाथ चालण्यायोग्य नसून, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, मनपा प्रशासनातील दिरंगाई चव्हाट्यावर  आणली होती. या मालिकेची दखल घेत महापालिकेने फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला प्रारंभ केला. आता अनेक दिवसांपासून अडगळीत पडलेले धोरण बाहेर काढून सभागृहात मंजुरीसाठी पाऊल उचलले आहे. येत्या २० जून रोजी सभागृहात फूटपाथ, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या मैदानांवर कचरा टाकणे, बांधकाम साहित्य टाकणे, लघुशंका करणाऱ्यांविरोधात कारवाई व दंडाचे धोरण मंजुरीसाठी येणार आहे. या धोरणाअंतर्गत महापालिका प्रत्येक झोनमध्ये कचरा करणारे, अवैध होर्डिंग्स लावणारे, बांधकामाचा मलबा टाकणारे, थुंकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी दहा झोनमध्ये प्रत्येकी एक, असे दहा पथके तयार करण्यात  येणार आहे. झोनमध्ये फिरण्यासाठी या पथकाला वाहन दिले जाणार असून एक पथकप्रमुख, चार मदतनीस व एक वाहनचालक असे सहा जणांचे पथक राहणार आहे. या पथकांमध्ये माजी सैनिकांची नियुक्ती केली जाणार आहे. या पथकाला दंड आकारण्याचे अधिकार देण्यात येणार आहे.  नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडातूनच पथकातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन केले जाणार असल्याने त्यांची कचरा करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. कचरा करणाऱ्यांत नागरिकांसह दुकानदार, हाथठेले, भाजी विक्रेते, शैक्षणिक संस्था, दवाखाने, हॉटेल, मंगल कार्यालये, विनापरवानगी विद्युत खांब, झाडांवर होर्डिंग्स, फलक लावणारे, जनावरे बांधणारे, बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांचा समावेश आहे. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक २ कोटी १० लाख ६६ हजार रुपये खर्चालाही सभागृहात मंजुरी देण्यात येणार आहे.

‘बायोमेडिकल वेस्ट’साठी धोरणानुसार कारवाई
रस्ते, मोकळ्या जागेवर बायोमेडिकल वेस्ट टाकणारे रुग्णालय, दवाखान्यांवर त्यांच्यासाठी यापूर्वीच आखलेल्या धोरणानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय रस्त्यांवर मंडप, स्वागतद्वार उभारणाऱ्यांवरही त्यासाठी आखलेल्या धोरणानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: nagpur news fine garbage footpath