कुख्यात राजा वानखेडेवर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक मामा धोटे यांचा मुलगा पंकज  धोटेने कुख्यात सुमित ठाकूर गॅंगचा सदस्य असलेल्या राजा वानखेडेवर गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात सुदैवाने राजा हा थोडक्‍यात बचावला. ही घटना बुधवारी रात्री आठ  वाजताच्या सुमारास बोरगावमधील शंभू कॅंटीनमध्ये घडली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पंकज धोटेवर गुन्हा दाखल केला.

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक मामा धोटे यांचा मुलगा पंकज  धोटेने कुख्यात सुमित ठाकूर गॅंगचा सदस्य असलेल्या राजा वानखेडेवर गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात सुदैवाने राजा हा थोडक्‍यात बचावला. ही घटना बुधवारी रात्री आठ  वाजताच्या सुमारास बोरगावमधील शंभू कॅंटीनमध्ये घडली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पंकज धोटेवर गुन्हा दाखल केला.

पंकज मामा धोटे याला राजकीय पक्षाचा वरदहस्त असल्यामुळे गुन्हेगारी जगतात दबदबा आहे. कुख्यात गुंडही घाबरत असून तो संपूर्ण शहरात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्नात होता.  राजकीय पक्षाच्या नावाने काही युवकांना सोबत घेऊन शहरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती आहे. त्याची राजा धोटे या कुख्यात गुंडांशी जुने वैर आहे. कुख्यात गुंड सुमित ठाकूरचा ‘राईट हॅंड’ असलेला राजा हा सुमितनंतर डॉन बनण्याची तयारी करीत होता. राजकीय वरदहस्त असलेल्या सुमित ठाकूरवर मोक्‍का लागला असून, तो सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत राजा वानखेडे त्याचा वारसा चालवीत दहशत पसरविणे सुरू केले होते. वर्चस्वाच्या वादातून पंकज आणि राजा यांच्यात अनेकदा वाद झालेत. दोघांनी आमने-सामने धमक्‍याही दिल्यात. मात्र, पंकजने नियोजित कट रचून राजाचा ‘गेम’ करण्याचे निश्‍चित केले. त्याप्रमाणे राजा दिनशॉ फॅक्‍टरीसमोरील शंभू कॅंटिनमध्ये बसला होता. पंकजने तेथे पोहोचून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी राजाच्या कानशिलापासून गेली तर दुसरी गोळी कारची कोचा फोडत आत शिरली. त्यातून तो सुदैवाने बचावला आणि कार सोडून पळायला लागला. फायरिंगच्या आवाजाने नागरिकांनी पळापळ केली. गर्दीचा फायदा घेऊन राजा पळून गेल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

गुन्हे शाखेची पथके तैनात 
घटनास्थळावर पोलिस उपायुक्त संभाजी कदम आणि गिट्टीखदानचे पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी भेट दिली आणि बुलेट केस जप्त केल्यात. प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेऊन गुन्हे शाखेची चार  पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली. यामुळे गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली होती. दोन्ही गॅंगचे सदस्य भूमिगत झाले होते, हे विशेष.

टीपवरून गेम करण्याचा प्रयत्न
पंकज धोटे हा गेल्या आठवड्याभरापासून राजा वानखेडेच्या शोधात होता. मात्र, राजा हा घाबरून भूमिगत झाला होता. पंकजने पंटर नेमून राजाची माहिती गोळा करणे सुरू केले होते. बुधवारी सायंकाळी सात आठ वाजता राजा हा शंभू कॅंटीनमध्ये असल्याची टीप पंकजला मिळाली. पंकजने लगेच तेथे पोहोचून राजाला कोंडीत पकडून गोळीबार केला. मात्र, नवख्या असलेल्या पंकजचा नेम आणि ‘गेम’ चुकला.

Web Title: nagpur news Firing crime