फूटपाथवर बिनधास्त फटाका दुकाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - महापालिकेच्या अग्निशमन विभागाने फटाका दुकानदारांना परवानगी नाकारली. मात्र, फटाका दुकानदारांनी प्रशासनापुढे आव्हान उभे करीत फूटपाथवरच दुकाने थाटली. झोन कार्यालयातील सहायक आयुक्तांच्या अभयामुळे ही दुकाने अद्याप कायम असून, आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाईचे दिलेले निर्देशही पायदळी तुडविल्याचे चित्र आहे.

नागपूर - महापालिकेच्या अग्निशमन विभागाने फटाका दुकानदारांना परवानगी नाकारली. मात्र, फटाका दुकानदारांनी प्रशासनापुढे आव्हान उभे करीत फूटपाथवरच दुकाने थाटली. झोन कार्यालयातील सहायक आयुक्तांच्या अभयामुळे ही दुकाने अद्याप कायम असून, आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाईचे दिलेले निर्देशही पायदळी तुडविल्याचे चित्र आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी फटाके दुकाने न लावण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे यंदा महापालिकेच्या अग्निशमन विभागाने फटाका दुकानांबाबत सावध पवित्रा घेतला. फटाक्‍यांची दुकाने सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी लावण्याचे टाळण्यासाठी झोन सहायक आयुक्तांना झोन परिसरातील मोकळ्या मैदानाची यादी अग्निशमन विभागाने मागितली होती. परंतु, झोनच्या सहायक आयुक्तांनी यादी अग्निशमन विभागाला उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने फटाका विक्रीच्या परवानगीसंदर्भात फटाका विक्रेत्यांना नाहरकत प्रमाणपत्र नाकारले. परिणामी पोलिसांनीही फटाका दुकानांना परवानगी दिली नाही.

परवानगी नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी तसेच फूटपाथवर फटाका दुकाने लावली आहे. झोन कार्यालयाला अतिक्रमणविरोधी कारवाईचा अधिकार असूनही एकाही सहायक आयुक्तांनी फटाका विक्रेत्यांना हटविले नाही. यासंबंधात आयुक्तांनी झोन कार्यालयांना अतिक्रमणविरोधी कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, झोन सहायक आयुक्तांनी आयुक्तांनाच आव्हान देत फूटपाथवर फटाका विक्रेत्यांना अभय दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

सहायक आयुक्तांची दादागिरी
केंद्रीय कार्यालयातून अनेक निर्देश सहायक आयुक्तांना दिले जाते. मात्र, त्याचे पालन केले जात नसल्याचे अनेकदा दिसून आले. सहायक आयुक्तांकडून केंद्रीय कार्यालयाचे निर्देश केराच्या टोपलीत टाकण्यात येत असल्याचे सूत्राने सांगितले. मालमत्ता करवसुलीबाबत सहायक आयुक्तांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याने शक्‍य असतानाही उत्पन्नाचे लक्ष्य गाठणे शक्‍य होत नसल्याचेही सूत्राने नमूद केले.

फटाका दुकानांना स्वच्छता करातही सूट
फटाका दुकानदारांकडून तीन हजार रुपये स्वच्छता शुल्क आकारण्याबाबत महापालिकेच्या नियमात तरतूद आहे. मात्र, अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे टाळणाऱ्या झोन सहायक आयुक्तांनी तीन हजारांचा स्वच्छता करही आकारण्याचे टाळल्याचे चित्र आहे. यासंबंधात स्पष्ट निर्देश असताना सहायक आयुक्तांनी दुर्लक्ष करीत महापालिकेचा महसूल बुडविल्याचे समजते. 

Web Title: nagpur news footpath Crackers shop