स्वच्छतेबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार!

राजेश प्रायकर
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नागपूर - एकीकडे हागणदारीमुक्त नागपूरसाठी ११ हजारांवर सार्वजनिक शौचालये बांधली असतानाच अनेक वर्षांपासून असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत उदासीनतेमुळे स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. इमामवाड्यातील जुन्या सार्वजनिक शौचालयांत पाण्यासह कुठलीही सुविधा नसल्याने परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले असून चिमुकल्यांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून स्वच्छतेबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

नागपूर - एकीकडे हागणदारीमुक्त नागपूरसाठी ११ हजारांवर सार्वजनिक शौचालये बांधली असतानाच अनेक वर्षांपासून असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत उदासीनतेमुळे स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. इमामवाड्यातील जुन्या सार्वजनिक शौचालयांत पाण्यासह कुठलीही सुविधा नसल्याने परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले असून चिमुकल्यांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून स्वच्छतेबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

सध्या स्वच्छता सर्वेक्षणात शहराला अग्रमानांकन मिळवून देण्यासाठी संपूर्ण महापालिकेची यंत्रणा राबत आहे. यात प्रामुख्याने स्वच्छता ॲप डाउनलोड करण्यावरच भर दिला जात असून स्वच्छतेच्या मूळ मुद्द्यालाच बगल दिली जात असल्याचे इमामवाडा येथील जुन्या सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेने अधोरेखित केले आहे. इमामवाड्यात अनेक वर्षे जुनी सार्वजनिक शौचालये असून परिसरातील काही नागरिकांकडे व्यक्तिगत शौचालये नसल्याने त्याचा वापर करतात. येथे सार्वजनिक शौचालयासाठी पाण्याचे टाके आहे, टाकी आहे. परंतु, त्यात पाणीच नसल्याने नागरिक, परिसरातील चिमुकले घाण करून निघून जातात. 

या घाणीच्या दुर्गंधीने या परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. या वस्तीतील अनेकांकडे शौचालये आहेत. त्यामुळे याचा वापर कमी झाला असल्याचेही या परिसरातील नागरिकांनी नमूद केले. त्यामुळे ही सार्वजनिक शौचालये तोडून जागा मोकळी करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी ‘सकाळ’सोबत बोलताना केली. या सार्वजनिक शौचालयाभोवती परिसरातील नागरिक कचराही टाकत असल्याने ही जागा कचराघरच झाली आहे. या परिसरात कचरा गाडी आठवड्यातून एक किंवा दोनदा येत असल्याने परिसरातील नागरिक कचरा येथे फेकतात, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे स्वच्छता सर्वेक्षणात शहराला मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न होत असताना या परिसरातील नागरिक या अभियानाबाबत अनभिज्ञ दिसून आले. त्यामुळे स्वच्छतेची मोहीम केवळ ‘पॉश’ भागातच सुरू असल्याचे चित्र आहे. येथील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करून येथे पाणी, वीज आदी उपलब्ध करून द्यावे किंवा ते पाडावे, अशी ओरड आहे. 

असामाजिक तत्त्वांचा वावर
सार्वजनिक शौचालय परिसरात रात्रीनंतर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. काळोख  होताच येथे गांजा, दारू पिणाऱ्यांची गर्दी होत असून परिसरातील महिला, तरुणींना रस्त्यांवर चालणेही कठीण होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. दारुड्यांकडून शिवीगाळ होत असल्याने आजूबाजूच्या घरांतील दारे रात्र होताच बंद करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

नगरसेवकांकडून केवळ आश्‍वासन
येथील सार्वजनिक शौचालय तोडण्यासंदर्भात धंतोली झोनला अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतु, अद्याप प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे या परिसरातील रहिवासी राजेश नाईक यांनी सांगितले. नगरसेवक विजय चुटेले यांनाही याबाबत लेखी निवेदन, मौखिक विनंती केली. परंतु, तेही केवळ आश्‍वासनेच देत असल्याचे नाईक यांनी नमूद केले. 

सार्वजनिक शौचालये तोडावीत
सार्वजनिक शौचालये तोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत धंतोली झोन कार्यालय, पोलिस स्टेशन व नगरसेवकांकडे तक्रार देण्यात आली. निवेदने देण्यात आली, परंतु कुणीही इकडे फिरकत नसल्याचे मनीषा भगत या तरुणीने नमूद केले. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता व्हायची. परंतु, आता स्वच्छतेसाठी कुणीही फिरत नसल्याने दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचेही या तरुणीने सांगितले.

Web Title: nagpur news garbage cleaness