वाहनातूनच गॅसचोरीची डिलिव्हरी

वाहनातूनच गॅसचोरीची डिलिव्हरी

नागपूर - राज्यातील शेकडो पेट्रोल पंपांवरील मशीनमध्ये पल्सर चिप टाकून कोट्यवधींच्या पेट्रोल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यापाठोपाठ आता गॅस सिलिंडरमध्येही ‘मापात पाप’ समोर आले आहे. सीलबंद गॅस सिलिंडरमधून एका विशिष्ट मशीनच्या मदतीने रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅसची चोरी केली जाते. प्रत्येक सिलिंडरमागे दीड ते अडीच किलो गॅसची चोरी होत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

घरात वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरी व्हॅनमध्ये वजनकाटा नसतो. कोणताही ग्राहक घरात वजनकाटा बाळगत नाही. लोखंडी सिलिंडरमध्ये किती गॅस आहे, हे कधी तपासतही नाही. याचाच गैरफायदा सिलिंडर पोहोचविणारे कर्मचारी घेतात. सिलिंडर स्वीकारण्यासाठी महिलावर्गच घरी असतो. त्यामुळे डिलिव्हरी बॉय त्यांच्याकडून २० रुपये अधिकचे घेतो. सिलिंडर घरापर्यंत पोहोचविण्याचा चार्ज असल्याचे सांगून तो सहजपणे गंडा घालतो. 

गॅसधारक ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून गॅस वितरण कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्य मापन विभाग आहे. मात्र, या विभागाकडून एकही कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही. डायरेक्‍ट कॅश ट्रान्सफर योजनेतही ग्राहकांच्या खिशाला जवळपास दोन ते तीन रुपयांनी चुना लागत आहे. 

तक्रार करा 
वैध मापन पद्धती विभागाच्या नियमानुसार कर्मचाऱ्याने गॅस सिलिंडर देण्यापूर्वी ग्राहकासमोर वजन करावे. नंतरच सिलिंडर सोपविणे बंधनकारक आहे. जर १४.२ किलाग्रॅमपेक्षा कमी वजन मिळाले, तर संबंधित गॅस एजन्सीच्या विरोधात तक्रार दाखल करावी. 

रहाटे कॉलनीत पकडले होते रॅकेट
धंतोलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने रहाटे कॉलनी चौकात एका गॅस गोदामाजवळच एका ट्रकवर छापा मारला होता. यामध्ये चार कर्मचारी सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस चोरी करताना आढळले. गॅस चोरी करीत असल्याची कर्मचाऱ्यांनी कबुलीसुद्धा दिली होती. या प्रकरणात ट्रक जप्त करून कर्मचाऱ्यांसह एजन्सीच्या व्यवस्थापकारवरसुद्धा कारवाई करण्यात आली होती. 

हॉटेलमालकांना सिलिंडरची विक्री
प्रत्येक सिलिंडरमधून गॅस चोरी केल्यानंतर भरलेले सिलिंडर ठरलेल्या हॉटेल मालकांना विकले जाते. या सिलिंडरची ७० टक्‍के रक्कम हॉटेलमालकाकडून घेतली जाते. रात्रीच्या सुमारास हा सर्व व्यवहार केला जातो. एका एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापकसुद्धा या मापाच्या पापात सहभागी असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com