गझलेने मजला नेले नक्षत्र कुळांच्या देशी!

विजयकुमार राऊत
सोमवार, 15 जानेवारी 2018

ढोले यांची साहित्यसंपदा
अग्निबन (काव्यसंग्रह), कळा काळजाच्या (गझलसंग्रह), वेदनांची वेदशाळा, सोहळे ऋतूंचे (ललितलेखसंग्रह), मातीतली माणसं (व्यक्‍तिचित्रसंग्रह), चांदणीचा काटा (कथासंग्रह), रिकामगिरी विनोदी (लेखसंग्रह).

नागपूर - जीवनात गझल आली नसती तर जीवनाची काय दशा झाली असती? गझलेनेच मला जगणे शिकविले. तू लिहितो तीच खरी गझल, अशी शाबासकी देताना भटांच्याच भाषेत ढोलेंची गझल अक्षरशः मला ‘चढली’, अशी दाद देणारे कविवर्य सुरेश भट यांच्याबरोबरच गझलेचाही मी आजन्म ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना कविवर्य नीलकांत ढोले थोडे भावविव्हळ होतात. ते आज वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आजही त्यांची प्रकृती उत्तम असून, मात्र गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून ते अविरतपणे गझल लिखाण करूनही एकांतवासात जगत आहेत. या ‘गझल-तपस्व्या’च्या शब्दात सांगायचे  झाले तर... 

प्रत्येक सोसलेला आघात याद आहे
नाबाद राहिलेला मी ‘सिंधबाद’ आहे !!

गझलेतला हा ‘सिंधबाद’ आज आयुष्याचा उत्तरार्धात साधे व चिंतामुक्‍त जीवन जगत  आहे. ना कुठली तक्रार ना कुठला आक्षेप!

कविवर्य नीलकांत ढोले यांची वृत्ती ही गझलेला पोषक. पु. ल. देशपांडे म्हणतात तशी. गझल केवळ वृत्त नसून वृत्ती असल्याचे प्रत्यंतर त्यांची गझल वाचताना आल्यावाचून राहत नाही. काव्यलेखन करता करताच गझलेने त्यांची निवड केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थेट शब्द बोट धरून अर्थापर्यंत घेऊन जातात, अर्थ आशयापर्यंत नेऊन पोहोचवितात. परंतु, गझल  मात्र थेट काळजापर्यंत नेऊन सोडल्यानंतरही गझल रंध्रारंध्रातून एका लयबद्धतेने झिरपत राहते.  मग एखाद्या क्षणी कुठल्यातरी गझलेची सुरावट नकळत आपल्या ओठांवर येते. ढोले सरांची गझलही तशीच. प्रत्येक क्षणी हृदयाशी आरपार संवाद साधणारी. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनीही त्यांची गझल एका चित्रवाहिनीच्या कार्यक्रमात गायिली. प्रसिद्ध पार्श्‍वगायक सुरेश वाडकर ‘जे इथे घेऊन आलो, द्यायचे राहून गेले’ ही गझल गाऊन जातात.

कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझलेचे रोपटे लावले. गझल मनामनांत शिरली. आजची पिढीही भरभरून गझल लिहायला लागली. मात्र, ही पिढी व्यक्‍त होत आहे, म्हणून नुसते समाधान व्यक्‍त करीत नाही, तर वृत्त न सांभाळता केवळ ‘ट’ला ‘ट’ जोडणे म्हणजे गझल नव्हे, असे मानतात. शब्दांची निवड आणि व्यक्‍त होण्याची खूप घाई या त्रुटी टाळल्या तर त्यांनाही उत्तम गझल  लिहिता येईल, अशी अपेक्षा व्यक्‍त करतात. रदीफ, काफिया सांभाळूनच गझलेतील विरोधाभास जपला तर गझलेचे भावगीत होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्‍यक असल्याचे ते सांगतात. त्यासाठी ‘मीटर’ पाळलेच पाहिजे, असा भटांसारखा आग्रह ते धरतात.

मी शोधीत होतो जेव्हा ओसाड मनाच्या वेशी
गझलेने नेले मजला, नक्षत्र कुळाच्या देशी !

गझलेनेच मला इथपर्यंत हातात हात धरून आणले, जीवनातला विरोधाभास कळला. माणसे कळली, असं ते मानतात. त्यांच्या गझलेने विद्रोह, प्रणय यापासून अध्यात्मापर्यंतचा लांबलचक प्रवास केला. वेगवेगळया टप्प्यावर गझलेने आपले स्वरूप बदलले, ‘लहजा’ मात्र अधिकाधिक खुलत गेला. सुरेश भटांबरोबर भीमराव पांचाळे हे गझलक्षेत्रातील ‘माइलस्टोन’ असल्याचे ते मानमात.  

Web Title: nagpur news gazal Neelkanth Dhole