पितळ उघडे पडेल म्हणून विरोधकांचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नागपूर - आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीतील घोटाळे चव्हाट्यावर येतील आणि आपण उघडे पडू, या भीतीमुळे कर्जमाफीच्या विषयावर चर्चा करायला विरोधक तयार नाहीत. याच कारणासाठी गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला. 

नागपूर - आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीतील घोटाळे चव्हाट्यावर येतील आणि आपण उघडे पडू, या भीतीमुळे कर्जमाफीच्या विषयावर चर्चा करायला विरोधक तयार नाहीत. याच कारणासाठी गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला. 

गिरीश बापट यांनी मंगळवारी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा लाभ खरोखरच गरजू शेतकऱ्यांना मिळावा याची खबरदारी घेतली जात असल्याने थोडा विलंब होत असल्याचे सांगितले. आम्ही कर्जमाफीच्या चर्चेला तयार आहोत. आकडेवारीसुद्धा द्यायला तयार आहोत. 

आतापर्यंत ४४ लाख शेतकऱ्यांना लाभसुद्धा दिला आहे. मात्र, विरोधक ऐकून घेण्यास तयारी नाहीत. सभागृहाबाहेर घोटाळ्याचे आरोप करतात. त्यांनी चर्चेला यावे आम्ही २००८ साली झालेली आणि आताची कर्जमाफी याची तुलनात्मक आकडेवारी सांगू. कोणाला किती लाभ मिळाला याचीही माहिती देण्यास तयार आहोत. मात्र, खरी माहिती समोर येईल, अधिवेशनाती मुद्दे संपून जातील, म्हणून ते चर्चेला फाटा देत आहेत. चोरीच केली नसेल, तर भिण्याचे कारण काय, असेही बापट म्हणाले. 

शरद पवारांची प्रशंसा
शरद पवार यांनी शेतमालाचे उत्पन्न वाढविण्यासाठी भरपूर काम केले आहे. फक्त शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा करण्याचा सल्लासुद्धा शेतकऱ्यांना दिला होता. तो योग्यच आहे, अशा शब्दात बापट यांनी शरद पवार यांची प्रशंसा केली. आम्हीसुद्धा जोडधंद्यासाठी पाठपुरवा करीत आहेत. थोडीजरी नापिकी झाली, नैसर्गिक संकट आले की, शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे गणित बिघडते. त्यातून तो कर्जबाजारी होतो. वर्षभर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्याची अत्यंत गरज आहे. भाजप सरकारतर्फे शेतमालाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. मात्र, यासाठी वेळ लागणार असल्याचे बापट यांनी सांगितले. 

‘सकाळ’चे कौतुक
अन्यायाला वाचा फोडण्याचे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना लोकांसमोर आणण्याचे काम ‘सकाळ’तर्फे सातत्याने केले जात आहे. चांगल्या कामांची दखल घेऊन योग्य प्रसिद्धीसुद्धा दिली जाते. पक्षीय राजकारणाचा विचार करीत नाही, अशा शब्दात बापट यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.

Web Title: nagpur news girish bapat talking