हनीमूनऐवजी नवरदेव पोलिस कोठडीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

लग्न ठरले अन्‌ वेळ चुकली
राहुलचे लग्न ठरल्याची माहिती रविनाला मिळाली. तिने त्याला लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, राहुलने तो धुडकावून लावला. त्यामुळे रविनाने पोलिसांत तक्रार केली. लग्नाच्याच दिवशी बोहल्यावरून अटक करण्याचा आटापिटा मुलीने केला. मात्र, पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी लग्नाच्या स्वागत समारंभापूर्वीच राहुलला अटक केली. 

नागपूर - एका दिवसापूर्वी युवकाचे थाटामाटात लग्न पार पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभाला पाहुणे येण्याऐवजी दारात पोलिसांची गाडी उभी झाली. पोलिसांनी लगेच नवरदेवाच्या हातात बेड्या ठोकल्या. हा सर्व प्रकार पाहून वराच्या लग्नघरी एकच गोंधळ उडाला. काल घोड्यावर बसलेला नवरदेव पोलिसांच्या गाडीत असल्याने चर्चेला उधाण आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी कहाणी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

राहुल संजय मेश्राम (वय २९, रा. वृंदावननगर) असे अटक केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. प्रेयसीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पीडित २२ वर्षीय युवती रविना (बदललेले नाव) ही मूळची देवरी (बुटीबोरी) येथील रहिवासी आहे. शिक्षण घेण्यासाठी ती नंदनवनमधील कापसी चौकात राहते. छापरूनगरात राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या घरी आली होती. त्या वेळी बहिणीचा  दीर आणि राहुल मेश्राम यांच्याशी ओळख झाली. १४ जानेवारी २०१६ मध्ये तिची व आरोपी राहुल मेश्राम यांची मैत्री झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान राहुलने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मुलीच्या आईवडिलांना लग्न करण्यासाठी दोघांनाही संमती दिली. त्यानंतर त्याने कौटुंबिक कारणे सांगून वारंवार टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने लग्नास नकार देऊन फसवणूक केली. या प्रकरणी रविनाच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल मेश्रामला अटक केली. 

लग्न ठरले अन्‌ वेळ चुकली
राहुलचे लग्न ठरल्याची माहिती रविनाला मिळाली. तिने त्याला लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, राहुलने तो धुडकावून लावला. त्यामुळे रविनाने पोलिसांत तक्रार केली. लग्नाच्याच दिवशी बोहल्यावरून अटक करण्याचा आटापिटा मुलीने केला. मात्र, पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी लग्नाच्या स्वागत समारंभापूर्वीच राहुलला अटक केली. 

Web Title: nagpur news groom in police custody