साईचरणी सोन्याने मढवलेली रुद्राक्षाची माळ अर्पण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्धा मार्गावरील साई मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकाने तब्बल आठ लाख रुपये किमतीची सोन्याने मढवलेली रुद्राक्षाची माळ साईचरणी अर्पण केली.

नागपूर - विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्धा मार्गावरील साई मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकाने तब्बल आठ लाख रुपये किमतीची सोन्याने मढवलेली रुद्राक्षाची माळ साईचरणी अर्पण केली.

शिर्डीप्रमाणेच नागपुरातील साईमंदिरातही दररोज भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. गुरुवारी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाविकांनी सोने-चांदीचे दागिने तसेच पूजेसाठी लागणारी विविध साहित्य गुरुदक्षिणेपोटी अर्पण केले. यामध्ये सोन्याने मढवलेल्या रुद्राक्ष माळेसोबतच ७० ग्रॅम वजनाच्या सुमारे ४.५ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या दोन वाट्या अर्पण केल्या.

मंदिर प्रशासनाने साईबाबांच्या आरतीसाठी सोन्याचे नवीन ताट आणि ग्लास अर्पण करण्याचा संकल्प व्यक्‍त केला आहे. यासाठी एकूण ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, भाविकाने एक लाखाचे आर्थिक सहकार्य दिले. उर्वरित रकमेसाठी भाविक आपापल्या परीने आर्थिक सहकार्य करीत असल्याची माहिती सचिव अविनाश शेगावकर यांनी दिली.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंदिर प्रशासनासह काही भाविकांनी स्वत:हून महाप्रसादाचे आयोजन केले होते. काही दिवसांपूर्वीच मंदिरातील साईबाबांचे सिंहासन आणि त्या मागील चांदीच्या भागाला सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे. २०१८ मध्ये साईबाबांचे १०० वे पुण्यतिथी वर्ष आहे. यासाठी आतापासूनच मंदिर प्रशासनातर्फे तयारी सुरू असल्याचे शेगावकर म्हणाले.

Web Title: nagpur news guru purnima