दर निश्‍चितीअभावी भट सभागृह तूर्तास बंद

राजेश प्रायकर 
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नागपूर - नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यक्रम घेण्यासाठी अनेक संस्थांनी महापालिकेची संपर्क करण्यास प्रारंभ केला. परंतु, सभागृहाचे भाडे अद्याप निश्‍चित न झाल्याने येथे कार्यक्रमासाठी परवानगी नाही. सभागृहाच्या भाडे ठरविण्यासाठी समिती ठरविण्यात आली असून, पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

नागपूर - नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यक्रम घेण्यासाठी अनेक संस्थांनी महापालिकेची संपर्क करण्यास प्रारंभ केला. परंतु, सभागृहाचे भाडे अद्याप निश्‍चित न झाल्याने येथे कार्यक्रमासाठी परवानगी नाही. सभागृहाच्या भाडे ठरविण्यासाठी समिती ठरविण्यात आली असून, पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह भव्यता व आकर्षकतेमुळे नागपूरकरांना खुणावत आहे. अनेक संस्थांनी कार्यक्रमासाठी या सभागृहाला पसंती दिली आहे. महापालिका अधिकाऱ्यांना दररोज पन्नासावर नागरिक सभागृहाच्या नोंदणीबाबत विचारणा करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, सभागृहाच्या भाड्याबाबत अद्याप काहीही निश्‍चित नसल्याने नागरिकांची, संस्थांची निराशा होत आहे. सभागृहाचे भाडे निश्‍चित करण्यासाठी महापालिकेने समिती गठित केली आहे. शहरातील इतर सभागृहाचे भाडे, याशिवाय इतर शहरातील सभागृहाच्या भाड्याबाबत ही समिती अभ्यास करीत आहे. ही समिती सभागृहाचे भाडे ठरविणार असून, स्थायी समितीकडे सभागृहाच्या दराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाठविणार आहे. या सर्व प्रक्रियेला पंधरा दिवस लागणार असून त्यानंतर भाडे निश्‍चित होणार असल्याचे अधिकाऱ्याने  नमूद केले. दररोज संस्थांचे फोन येत असून एका सामाजिक संघटनेने तर २०१९ मधील कार्यक्रमासाठी सभागृह बुकिंगचा प्रस्ताव दिला. परंतु, काहीही निश्‍चित नसल्याने संस्थांचे बुकिंगबाबतचे प्रस्ताव फेटाळण्यात येत आहे.

४५ दिवसांपूर्वी बुकिंग  
भट सभागृहाच्या नोंदणीसाठी अटी व शर्ती तयार केल्या जात आहे. कार्यक्रमाच्या ४५ दिवसांपूर्वी बुकिंग केली जाईल, अशी अट व शर्त ठेवण्यात येणार असल्याचे सूत्राने नमूद केले. महापालिका सांस्कृतिक धोरण तयार करीत असून यात आणखीही अटींचा समावेश राहणार आहे.

चार तासांचे आकारणार भाडे 
संस्थांना कार्यक्रमासाठी चार तासांसाठी सभागृह भाड्याने देण्यात येणार आहे. प्रत्येकी चार तासांसाठी सभागृहाचे भाडे आकारण्यात येणार आहे. सकाळी साडेआठपासून पहिल्या ‘स्लॉट’ला प्रारंभ होईल. सकाळी साडेआठ ते रात्री साडेबारापर्यंत, असे चार ‘स्लॉट’ करण्यात येणार आहे.

शनिवार, रविवारला  भाडे अधिक 
‘विकेंड’ला सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आदीचे मोठ्या प्रमाणात आयोजन होत असते. महापालिका या सभागृहाबाबत व्यावसायिक होणार असून या दोन दिवसांसाठी भाडे अधिक  राहणार असल्याचेही सूत्राने नमूद केले. 

स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिनी सभागृह आरक्षित 
स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिनासह शासकीय सुटीच्या दिवशी सभागृह भाड्याने देण्यात येणार नाही. शासकीय सुटीच्या दिवशी सरकारी कार्यक्रमांसाठी सभागृह कायम आरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थांना या दिवसाला येथे कुठलाही कार्यक्रम घेता येणार नाही. 

ध्वनी, प्रकाशव्यवस्थेसाठी तज्ज्ञ एजन्सी
सभागृहातील ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या व्यवस्थापनासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आली होती. परंतु, एकच निविदा आल्याने आता पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे. 

व्यवस्थापन क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडे
सभागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. याबाबत एका अधिकाऱ्याचेही नाव निश्‍चित करण्यात आल्याचे समजते.

Web Title: nagpur news hall closed due to the failure of the rate fix