येथे बिघडते आरोग्य

येथे बिघडते आरोग्य

नागपूर ग्रामीण - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) शहरातील गरीब रुग्णांसाठी वरदान आहे. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्र येथील रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. मेडिकलला रेफर करण्यापूर्वी त्यांच्यावर प्राथमिक उपचार येथेच होतो. मात्र, प्राथमिक आरोग्यकेंद्र नानाविध समस्यांनी ग्रासल्याचे ‘सकाळ’च्या प्रतिनिधींसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टिंगनंतर उजेडात आले. कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे, डॉक्‍टर व कर्मचारी मुख्यालयी न राहणे तसेच रुग्णवाहिकेचा अभाव आदींमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णवाहिका आहे; मात्र चालकच नाही. डॉक्‍टरांना कर्तव्याचे भाव नाही. रुग्णालयात उशिरा येणे, औषधांच्या नावावर निव्वळ टॅबलेट दिले जातात. रुग्णांना पिण्यासाठी किडे असलेले पाणी दिले जाते. त्यामुळे रुग्णालयात आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचे दिसून आले.

‘सकाळ’ने केले ग्रामीण रुग्णालयांचे ‘स्टिंग’
मौदा 
रुग्ण पितात माठातील दूषित पाणी

जिल्ह्याच्या टोकावर असलेले मौदा तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र खात. टोकावर असल्याने अधिकाऱ्यांचे इकडे लक्ष कमीच असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे, गैरहजर राहण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. रुग्णालयामध्ये प्लास्टिकच्या ३.५ हजार लिटरच्या चार पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या आहेत. परंतु, एकाही टाकीला झाकण नाही. टाक्‍यांमध्ये कीटक व पाली दिसल्या. पाणी फिल्टर करण्याची मशीन सुरू असली तरी थंड पाण्याची फ्रीज बंद होती. फिल्टरचे पाणी मटक्‍यामध्ये भरले जाते. मटक्‍याचे निरीक्षण केले असता, त्यातसुद्धा किडे आढळले. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते १२ असताना डॉक्‍टर १० वाजता येतात. प्राथमिक आरोग्यकेंद्र असल्याने डॉक्‍टर मुक्कामी असणे आवश्‍यक आहे. मौदा तालुक्‍यामध्ये चार पीएचसी व पाच उपकेंद्रांमध्ये एकूण १३ डॉक्‍टरांची गरज असताना केवळ ९ डॉक्‍टर उपलब्ध आहेत. खात येथे आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना मून व निहारवानी उपकेंद्राच्या डॉ. हेमलता हिंगे आहेत. डॉ. कल्पना मून यांचे पंचायत समितीच्या आढावा सभेसाठी जाणे नियोजित होते. आढावा सभा रद्द झाल्यानंतर त्या खातला येणे अपेक्षित होते. परंतु, डॉ. मून दिवसभर दिसल्याच नाही.

सहभाग : राजेंद्र रावते, अरुण शेंदरे, चंद्रशेखर ढोबळे.


रुग्ण पाहतात डॉक्‍टरांची वाट
सकाळी आठपासून सुमारे २५ रुग्ण डॉक्‍टरांची वाट पाहात बसले होते. खात येथे डॉक्‍टरसह कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था आहे. परंतु, काही अधिकारी व कर्मचारी बाहेरगावावरून ये-जा करीत असल्याची माहिती रुग्णांनी दिली. उपचारानंतर केवळ टॅबलेट दिल्या जात असल्याची तक्रार रुग्णांनी केली.

सोमवारी (ता. तीन) दहेगाव उपकेंद्रामध्ये होती. थोड्या वेळासाठी गावामध्ये रुग्णांना भेट द्यायला गेली होती. माझ्या उपस्थितीत डॉ. कल्पना मून भेटीसाठी आल्या नाही.
-संघमित्रा कावळे, एएनएम, दहेगाव उपकेंद्र.
पंचायत समितीची आढावा बैठक रद्द झाल्यामुळे दहेगाव येथील उपकेंद्राला भेट देण्यासाठी गेली होती.
-डॉ. कल्पना मून, आरोग्य अधिकारी, पीएचसी खात.
खात पीएचसीमधील डॉक्‍टरांना जबाबदारीचे भान नाही. यासंबंधी येथील रुग्ण नेहमी फोन करतात. संबंधित डॉक्‍टरांना सांगून थकले. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.
-डॉ. नीलिमा तडस, तालुका आरोग्य अधिकारी, मौदा.

तक्‍ते अद्ययावत नाही
डॉक्‍टरांच्या दालनातील व दवाखान्यातील राष्ट्रीय लसीकरण, कुपोषण, जननी सुरक्षा, राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम, रक्ततपासणी तक्ता, जन्मानुसार लिंग दर्शविणारा तक्ता आदी तक्‍ते अद्ययावत नव्हते. दैनंदिन औषधी वाटपाचे रजिस्टर १८ मेपासून अद्ययावत नसल्याचे आढळले.

कळमेश्‍वर
कळमेश्‍वर रुग्णालयात ट्रॉमा सेंटरची गरज

काटोल-कळमेश्‍वर नागपूर या महामार्गावर शैक्षणिक झोन निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याने कळमेश्‍वर मध्यभागी असल्याने ट्रॉमा सेंटर झाले तर अनेकांचे प्राण वाचतील.

सोनोग्राफीची आवश्‍यकता
काही रुग्णांच्या मते, रुग्णालयात असलेल्या एक्‍सरे मशीनसह सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागणार नाही.

अतिक्रमण हटवावे
रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीसमोर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दुकाने थाटल्या गेल्याने रुग्णालय अडचणीत आले आहे. दुकाने तातडीने हटविल्यास रुग्णालयाचा मार्ग मोकळा होईल.

दोन महिन्यांपासून औषध नाही
सुधाकर भक्‍ते हे गृहस्थ मुलाला रुग्णालयात घेऊन आले. डॉक्‍टरांनी लिहून दिलेले खोकल्याचे औषध रुग्णालयात औषध मिळाले नसल्याने त्यांनी तक्रार केली. दोन महिन्यांपासून खोकल्याचे औषध रुग्णालयात नसल्याचे त्यांनी सांगितले.

काटोल 
रुग्णवाहिका आहे; मात्र चालक नाही
शेर शिवाजी संघटनेकडून काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात ‘स्टिंग’ करण्यात आले. रुग्णालयामध्ये नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले जाते; परंतु शस्त्रक्रियेसाठी नागपूर जावे लागते. रुग्णवाहिका आहे; मात्र चालक नसल्याने १०८ किंवा खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या मशीन बंद आहेत. रुग्णालयात दररोज १५० ते २०० रुग्ण येतात. अत्यावश्‍यक स्थितीत रुग्णांना सरळ नागपूरला रेफर केले जाते. येथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या होतात. परंतु, सोनोग्राफीची व्यवस्था नाही. कॅन्सरसारख्या आजारावर औषधोपचार उपलब्ध नाही. रुग्णालयात जवळपास ४० ते ५० कर्मचारी आहेत. मात्र, रात्रीला एक डॉक्‍टर व एक-दोन कर्मचारी सापडतात. रात्रीला रुग्ण आल्यास स्ट्रेचरवर नेण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसते.

सहभाग : सागर राऊत, भूषण पुंड, अक्षय धोटे, मयूर बोडखे, दीपक मोरोलीया, शुभम धोटे, वैभव काळे, गौरव गौरखेडे, महेश ठाकरे.

हिंगणा
चलता हैं, चलने दो!

हिंगणा ग्रामीण रुग्णालयात जाताच तिथली परिस्थिती लक्षात येते. डॉक्‍क्‍टर कक्ष अंधारात आढळला. कक्षात कुणीच नव्हते. आरोग्य केंद्रात विचारपूस करण्याचीही सोय नाही. सफाई महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्‍टरांना माहिती देताच डॉक्‍टर उपस्थित झाले. बातमी लिहून काय होणार, असा उपरोधिक प्रश्‍न त्यांनी केला. डॉक्‍टर नाही, नर्स नाही, शवविच्छेदन करणारे नाहीत, औषधे नाहीत, बातमी लिहून काय होणार, असे उर्मट उत्तर त्यांनी दिले. चलता है.. चलने दो ! असे म्हणत त्यांनी रुग्णालयातील समस्यांना धुडकावून लावले. जिथे अशी वागणूक असेल तिथे सर्वसामान्य रुग्णांचे काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला. 
सहभाग ः सोपान बेताल

सावनेर
कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्‍यात

सावनेर : रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा असून, तिघांच्या खांद्यावर रुग्णसेवेचा भार आहे. बारा प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर रुग्णालयात कार्यरत आहेत. हेल्थ युनिटमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांचे राहणे गरजेचे आहे. परंतु, क्वॉर्टरची दुरवस्था झाल्याने ते नागपूरवरून ये-जा करतात. त्यामुळे रुग्णांना योग्य सेवा पुरविणे त्रासाचे झाले आहे. काही कर्मचारी येथे राहत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी विहिरीमधून घ्यावे लागत असून, विहिरीत घाण साचली आहे. विहिरीतून पाणी टाकीत जमा केले जाते. परंतु, ही टाकी आठ वर्षांपासून स्वच्छ केलेली नाही. गडर लाइन चोक झाल्याने सर्वत्र घाण पसरलेली आहे. या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कार्यालय जुनाट व मोडक्‍या अवस्थेत असून, काहींची दारे तुटून भगदाड पडलेली आहे. बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही दुर्लक्षच होत आहे. यासंबंधी प्रपाठक प्रशांत बागडे यांच्याशी बोलले असता चौकशी करून लवकरच दखल घेणार असल्याचे सांगितले.

येथील ग्रामीण आरोग्यकेंद्र व हेल्थ युनिट समस्यांनी ग्रासले आहेत. रुग्णालयाच्या आवार भिंतीच्या आतील भागात घाण पसरली असून, स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कचऱ्यांच्या टाक्‍यात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. जैविक कचरा हा अस्ताव्यस्त पडलेला आढळला. यासंबंधी सॅनेटरी इन्स्पेक्‍टर झाडोदे यांना विचारणा केली असता त्यांनी मनुष्यबळाच्या अभावामुळे ही समस्या असल्याचे सांगितले. आय.सी.टी.सी. विभाग बेवारस आढळला. काही विभागांतील कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त होते. अपघात विभागात डॉ. भूषण सेंबेकर व दोन दिवसांपूर्वी रुजू झालेले प्रशांत बागडे कर्तव्यावर होते. रुग्णालयात औषधांचा मोजका साठा आढळला. नवीन औषधांची कमतरता रुग्णालयात आढळली. रुग्णालयात एकच रुग्णवाहिका असून, १०८ ची मदत घ्यावी लागते.
सहभाग : मनोहर घोळसे, पांडुरंग भोंगाडे, दिनेश इंगोले, विक्रम गमे, नरेंद्र पारवे, सचिन लिडर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com