आरोपीची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागपूर - एका चार वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला धमकावणाऱ्याची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, अशी विचारणा करत सोमवारी (ता. ३०) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपी आणि आरोपीच्या वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावली. 

नागपूर - एका चार वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला धमकावणाऱ्याची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, अशी विचारणा करत सोमवारी (ता. ३०) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपी आणि आरोपीच्या वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावली. 

आरोपीचे नाव शंकर रामभाऊ ठाकरे असे आहे. घटनेच्या वेळी त्याचे वय २७ वर्षे होते. पेशाने रोजंदारी कामगार असलेल्या शंकर याने २० ऑक्‍टोबर २००१ रोजी एका चार वर्षीय मुलीचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कुणालाही सांगू नये यासाठी धमकाविले. या प्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला १९ जून २००४ रोजी दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले. त्यात आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. २००४  मध्ये जामीन मिळाल्यापासून आतापर्यंत आरोपीने कधीही स्वत:च्या वकिलाशी संबंध साधला नाही. यामुळे त्याला कसे शोधणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता. तब्बल १३ वर्षांनंतर हे प्रकरण न्यायालयासमोर आले असता आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढला. यानंतर आरोपीने रामटेक पोलिस स्टेशन येथे स्वत:हून शरणागती पत्करली. 

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व बाबी पडताळून पाहत आरोपीची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली. या प्रकारचे कृत्य करणाऱ्याला केवळ दोन वर्षे शिक्षा पुरेशी नाही, असे मौखिक ताशेरे ओढत न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर आरोपी आणि त्यांच्या वकिलांना वैयक्तिक पातळीवर १ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण द्यायचे आहे. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जे. एम. गांधी यांनी बाजू मांडली. 

Web Title: nagpur news high court punishment