हिमांशीच्या मदतीसाठी धावले परीक्षा भवन! 

हिमांशीच्या मदतीसाठी धावले परीक्षा भवन! 

नागपूर - परीक्षा असो वा निकाल विद्यापीठातील परीक्षा विभागावरच सारे खापर फोडले जाते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तुसडेपणाच्या वागणुकीमुळे या विभागावर सारेच नाराज असतात. मात्र, सोमवारी याच विभागाने माणुसकीचा परिचय दिला. बेताच्या आर्थिक  परिस्थितीमुळे परीक्षा शुल्क भरणे अशक्‍य असलेल्या हिमांशीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा केले. 

अंबाझरी परिसरात राहणारी हिमांशी बावणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये बी.कॉम.च्या प्रथम सेमिस्टरला शिकते. वडिलांचे छत्र हरविल्याने आईवरच घर चालविण्याची जबाबदारी येऊन ठेपली. त्यामुळे कसेबसे पैसे कमावून हिमांशीची आई मुलगी आणि घराचा सांभाळ करते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिमांशीच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने घर आणि शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी हिमांशीच्या खांद्यावर आली. या जबाबदारीमुळे केव्हा बी.कॉम. प्रथम सेमिस्टरचा अर्ज करण्याची तारीख निघून गेली हे कळलेच नाही. मंगळवारपासून विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे विलंब शुल्कासह पैसे भरणे गरजेचे होते. त्यामुळे एक शेवटचा पर्याय म्हणून हिमांशी आईसोबत परीक्षा भवन येथे परीक्षा नियंत्रकांना भेटण्यास आली. परीक्षा नियंत्रक नसल्याने तिने परीक्षा विभागाचे उपकुलसचिव नवीन मुंगळे यांचा कक्ष गाठला. तसेच त्यांच्यासमोर त्यांनी आपली आपबीती सांगितली. हिमांशीची आपबीती ऐकल्यावर मुंगळेसह इतर कर्मचाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटला. नियमानुसार विलंब शुल्कासह अर्ज करावयाचा होता. मात्र, इतके पैसे नसल्याने तिच्यासाठी अख्ख्या परीक्षा विभागातील कर्मचारी धावून आले. प्रत्येकाने आपल्या जवळचे पैसे जमा करून तिचे शुल्क भरले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याचे हे वेगळे रूप पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. एनएसयूआयचे अजित सिंग हे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनीही या प्रकरणात हिमांशीला मदत केली हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com