अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

आम्ही छापा मारायला गेलो. पण गाडी दिसताच दारू विकणारे सैरावैरा पळून गेलेत. अवैध दारू विक्री करणारे सापडल्यास अवश्‍य गुन्हा दाखल करू. अशा दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-अनिल जिट्टावार ठाणेदार, अरोली पोलिस ठाणे

कोदामेंढी - गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून याकडे अरोली पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करणार, असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

तरुण सामाजिक कार्यकर्ते किशोर साहू यांनी जणू ‘एल्गार’च पुकारला की काय, असा सवाल सर्वसामान्यांमध्ये करण्यात येत आहे. शासनाचे अवैध दारूबंदी धोरण असताना मोठ्या प्रमाणात दारूची सर्रास विक्री सुरू आहे. मटण मार्केटमध्ये सकाळपासून दारू पिणाऱ्यांची गर्दी असते. यावर आळा बसावा, यासाठी साहू यांनी फोटो काढला असता अवैध दारू विकणारे त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना धमकीही देण्यात येत आहे. याबाबत त्यांनी प्रत्येक घडामोडीचे ‘अपडेट व्हॉट्‌सअप’वर त्यांच्या नावानिशी उल्लेख करीत टाकले आहे. गावातील अवैध दारूविक्री तसेच सट्टापट्टी बंद करावी, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत पोलिसांना माहिती नसावी असे नाही. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई बरेचदा झालेली आहे. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

आज रात्री आठ वाजताच्या सुमारास माळी मोहल्ल्यातील चाळीस-पन्नास महिला दारूविक्रीच्या ठिय्यावर पोहोचल्या. मात्र मटण मार्केटमध्ये दारू विकणारे कुणीही आढळले नाही. वॉर्ड क्रमांक चारमधील पूनमचंद सिंगाडे यांच्या घरावर हल्लाबोल केला आणि सिंगाडे परिवारास शिवीगाळ केली. हे कितपत योग्य आहे? कायदा हातात घेण्याचे तंत्रच यांनी वापरले की काय? न्यायालयाच्या आदेशानुसार गावातील सरकारी देशी दारूची दुकान बंद झालेले आहे. मात्र तरीही अवैध दारूविक्री करणारे छुप्या पद्धतीने दारूची विक्री करीत आहेत. गावातील अवैध दारूविक्री व सट्टापट्टी बंद व्हावी, अशी ग्रामवासींची मागणी असून ते पुढे सरसावले आहेत. यावर शासन प्रशासन स्तरावर काय दखल घेतली जाते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title: nagpur news Illegal liquor shop